आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपवर नाना पटोलेंची टीका:म्हणाले- भाजपमुळेच आरक्षण गेले, ओबीसींना 27 टक्क्यांहून अधिक उमेदवारी देणार

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस 27 टक्क्यांहून अधिक ओबीसी उमेदवार देणार आहे, अशी घोषणा शनिवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. राज्यात ओबीसी आरक्षणावरून वातावरण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असे सांगितले आहे. यानंतर भाजपने 27 टक्के ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा केलीय. त्याचाच कित्ता काँग्रेसनेही गिरवला आहे.

नेमके काय म्हणाले नाना पटोले?
भाजपचे ओबीसीवर पुतणा मावशीसारखे प्रेम आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे. महाराष्ट्र ओबीसी मोर्चात आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी आरक्षण रद्द होण्यावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. यावरून नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आरक्षण संपवणे हाच आरएसएसचा अजेंडा आहे. असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भारतीय जनता पक्षच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजप आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

ओबीसी आरक्षण फडणवीसांमुळे गेले - पटोले
ओबीसी आरक्षणप्रश्नी बोलताना पटोले म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असताना 2017 साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. 2018 साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

बिगर भाजपशासित राज्यांना केंद्रांची मदत नाही - पटोले
महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले होते, परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देत, ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. मध्यप्रदेशमध्येही अशीच परिस्थिती ओढावली, तेव्हा मात्र केंद्र सरकारने त्यांना मदत करू अशी भूमिका घेतली. केंद्राकडून बिगर भाजपशासित सरकारला मदत करण्यात येत नसल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...