आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिलदरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना ‘महोत्सव’ कसा होऊ शकतो? असा प्रश्न करत लसीअभावी बंद लसीकरण केंद्राबाहेर काँग्रेस घंटानाद, थाळीनाद आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पटोले म्हणाले, संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. तो रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. पण, केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील कोरोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रुग्णसंख्या व लोकसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपशासित राज्यांना मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात आहे. कुठल्याही संकटात जनतेला वाऱ्यावर सोडून संकटाचा सोहळा साजरा करण्याचा रोग भाजपला जडला आहे, अशी टीका पटोले यांनी केली. राज्यांना मदत देण्यापेक्षा लस महोत्सवासारखे सोहळे करण्यातच केंद्रातले मोदी सरकार वेळ घालवत आहे. मोदी सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नसून लसींचा पुरेसा पुरवठा होऊन लसीकरण सुरळीत होईपर्यंत प्रदेश काँग्रेसकडून आंदोलन सुरूच राहील, असा इशारा पटोले यांनी दिला.
डॉ. आंबेडकर जयंतीपासून राज्यभरात रक्तदान सप्ताह
राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून ‘रक्तदान सप्ताह’ करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राज्यभर प्रदेश काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. मुंबईतून १० हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.