आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना जेल आणि बेल!:मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य, केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची पहिलीच वेळ, राज्यभरात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत राडा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संगमेश्वरात हायटेन्शन ड्रामा, राणे समर्थकांचा कडवा विरोध

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. मुंबई-कोकण, औरंगाबाद, नाशिक, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राणेंच्या अटकेचे आदेश निघालेल्या नाशिकसह राज्यातील अनेक शहरांमध्ये शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दरम्यान, राणेंची जनआशीर्वाद यात्रा चिपळूण येथून रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचताच संगमेश्वर तालुक्यात राणे यांना दुपारी साडेतीनच्या दरम्यान ताब्यात घेतले. तिथून त्यांना महाड येथे नेण्यात आले. रात्री ११ वाजेच्या सुमारास महाड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राणेंना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची कलमे राणे यांना लावण्यात आली असून या कलमांखाली अटकेची कारवाई करता येणार नाही, असा सर्वोच न्यायालयाचा निकाल आहे. याच मुद्द्यावर राणे यांना जामीन मिळाला असल्याचे राणे यांचे वकील अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी सांगितले. दरम्यान, राणे यांची जनआशीर्वाद यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. यात्रेचा पुढचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. परंतु जिल्ह्यात बुधवार, २५ ऑगस्टपासून सभा, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राणेंची यात्रा पुन्हा सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

जामीन मिळताच राणे मुंबईकडे...
मंगळवारी रात्री महाड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बाळासाहेब पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आल्यानंतर नारायण राणे यांच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम आणि अ‍ॅड. राजन शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाच्या वतीने भूषण साळवी यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाने ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. मात्र राणेंना जामीन मंजूर करतानाच येत्या ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरी लावण्याची अट टाकण्यात आली आहे. दरम्यान, रात्री १०.३० ला राणे यांच्या पत्नी नीलम राणे, मुलगा आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे न्यायालयात आले होते. रात्री नारायण राणे मुंबईकडे रवाना झाले.

गाेळवलकर गुरुजी स्मारकस्थळी जेवताना राणे यांना घेतले ताब्यात
रायगड (विवेक ताम्हणकर)

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी राज्यभरात गदारोळ सुरू असतानाच रत्नागिरी पोलिस मंगळवारी संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचले. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे गोळवली येथे गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्मारकस्थळी जेवणासाठी थांबले होते. तेव्हाच पोलिसांचा ताफा स्मारकस्थळी पोहोचला. जेवता-जेवताच राणेंंना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी राणेंचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे अाणि पोलिसांदरम्यान जोरदार वादावादी झाली. यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

अटक वाॅरंट नसल्याने राणेंचा नकार : संगमेश्वर तालुक्यातील गोळवलकर गुरुजी स्मारकात दर्शन घेऊन याच ठिकाणी जेवणासाठी राणे आणि त्यांचा ताफा थांबला असताना रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग अटक करण्यासाठी पोहोचले. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला. या वेळी पोलिस आणि राणेच फक्त खोलीत होते. भाजपच्या सर्व नेत्यांना आणि राणेंच्या सुरक्षा रक्षकांना खोलीबाहेर घालवण्यात आले. या वेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांनी राणे यांना अटक केली. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले आणि त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस घेऊन जात असताना राणे समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यापुढे राणे समर्थकांचा विरोध चालला नाही. संगमेश्वर येथे राणेंना घेऊन पोलिस दाखल होताच या ठिकाणी महाड पोलिसही दाखल झाले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात राणेंना आणण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. यानंतर राणेंना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर राणेंचा ताबा घेत राणेंना महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कोकण परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक, रायगडचे पोलिस अधीक्षकही महाडमध्ये दाखल झाले आहेत.

मला जबरदस्तीने तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न - राणे : मला रात्रभर तुरुंगामध्ये राहावं लागेल असं मी काही वक्तव्य केलेलं नाही. मी जे म्हणालो आहे ते कायद्याच्या भाषेत ‘गुन्हा’ होत नाही. तुम्ही याबद्दल कोणत्याही वकिलाला विचारू शकता. मला जबरदस्तीने लॉकअपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये माझा काहीच गुन्हा नाहीय, असं राणे यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये गुन्हा मग रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का ? : नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांची अटक होणार असल्याची माहिती समोर येताच त्यांनी तत्काळ रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला, मात्र नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असताना रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का ? असा प्रश्न विचारून न्यायालयाने राणेंचा जामीनअर्ज फेटाळला. त्यामुळे तत्काळ राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही तातडीने सुनावणी घेण्याचे नाकारल्याने राणेंच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली.

पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी - यात्रा प्रमुख प्रमोद जठार : केंद्रीय मंत्री राणे यांना ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरी पोलिस गेले होते. पोलिस अधीक्षक स्वतः राणेंशी चर्चा करत होते. यावेळी जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार माध्यमांसमोर आले आणि पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिसांकडे अटक वॉरंट असेल तर त्यांनी ते दाखवले पाहिजे, असे जठार म्हणाले.

राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी मार्गावर झाडे तोडून वाहतूक केली बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडे तोडून रस्त्यावर फेकली :
नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद रस्त्यावरही उमटले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचे गाव असलेल्या वरवडे येथे कणकवली आचरा राज्य मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून टाकत मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला. जिल्ह्यातील अन्य भागांतही झाडे तोडून मार्गावर आडवी करण्यात आली. कणकवली तालुक्यातील वरवडे पाठोपाठ पिसेकामते, कलमठ या ठिकाणीही झाडे तोडून मार्ग बंद करण्यात आला. हा मार्ग उशिरापर्यंत ठप्प झाला होता. तर मालवण तालुक्यातील नेरूरपार पूल येथे अज्ञातांनी झाडे तोडून मार्ग वाहतुकीला बंद केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करून रस्ता सुरळीत केला.

रत्नागिरीत शिवसैनिक आक्रमक, तर चिपळूणमध्ये भाजप- शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने : नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक पेटले असताना याचे पडसाद रत्नागिरीत देखील पाहायला मिळाले आहेत. लांजा राजापूर विधानसभेचे आमदार राजन साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून राणे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले व राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर चिपळूणमध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने- सामने आले. यामुळे काहीकाळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

वक्तव्याचे समर्थन नाही, पण भाजप राणेंच्या पाठीशी
मुंबई | केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी भाजप नसेल, पण नारायणराव राणे यांच्या भाजप पूर्णपणे पाठीशी आहे, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राणे यांच्या चिपळुणातील वक्तव्यावर राज्यात सेना, भाजप कार्यकर्ते भिडले आहेत.

मंत्र्याला अटक करण्यात कायद्याची अडचण नाही केंद्रीय मंत्रिपदावरील व्यक्तीला अटक शक्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. एखाद्या मंत्र्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्यांना अटक करण्यात पोलिसांना कायद्याची अडचण नसते. केवळ मंत्री ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या सभागृहाच्या सभापती अथवा अध्यक्षांना तातडीने त्याची माहिती कळवावी लागते.

मंत्र्याला कायद्याचे संरक्षण असते का ?
नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनाच कायद्याच्या दृष्टीने संरक्षण प्रदान करण्यात आहे आहे. केंद्र अथवा राज्य मंत्रिमंडळ सदस्याला गुन्हेगारी स्वरुपाचे कलमानुसार अटक करता येऊ शकते. राणे यांचे विराेधात पाेलीसांनी दाखल केलेली कलमे खूप महत्वपूर्ण नसून ती न्यायालयात टिकू शकणार नाही. हे केवळ राजकीय डावपेचासाठी सुरु असून कायद्याचे दृष्टीने त्यास फारसे महत्व नाही.

बातम्या आणखी आहेत...