आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्याचा वाद:अजित पवार म्हणाले - जनता कुणाच्या मागे हे मेळाव्यानंतर कळेल, तर शिवसेना कुणाची हे निवडणुकीत स्पष्ट होईल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनता कुणाच्या मागे हे मेळाव्यानंतर कळेल, तर शिवसेना कुणाची हे निवडणुकीत स्पष्ट होईल, अशी जोरदार आणि मार्मिक टोलेबाजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दसरा मेळाव्यावरून वाद घालण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला कानपिचक्याही दिल्या.

बाळासाहेबांचाच निर्णय

शिवतीर्थावरील दसरा मेळावा तसेच शिवसेना कुणाची? यावर शिंदे गट व उद्धव ठाकरे गटात वाद सुरू आहे. यावर अजित पवार म्हणाले, शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर सभा घेतल्या. अवघ्या महाराष्ट्राची जनता या सभा पाहत होती. अखेर याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना सोपवत असल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरे हेच शिवसेना चालवतील व शिवसेनेचे नेतृत्व करतील, असे बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितले होते.

जनताच काय ते ठरवले

अजित पवार म्हणाले, गेल्या 20 जूनपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे शिवसेनेतीलच एक गट आता सत्तेत आला आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळत नाहीये. ज्याच्या हातात सत्ता असते, ते त्यांच्याच बाजूने निर्णय घेतात, अशी सध्या स्थिती आहे. अशा स्थितीत शिवतीर्थावर पहिले कुणीतरी एकाचा कार्यक्रम होईल मग दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. मात्र, यावरून वाद घालून चालणार नाही. शेवटी सर्वसामान्य जनता कुणाच्या मागे आहे हे सभा झाल्यावर लक्षात येईल. निवडणुकीनंतर शिवसेना कुणाची हे कळेलच.

काँग्रेस फुटणार?

काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काही काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर अजित पवार म्हणाले, प्रसारमाध्यमं केवळ एक बाजू मांडत आहेत. मात्र, दुसरी बाजू स्वत: अशोक चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. दोघांनीही आपल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितले आहे. मीडियाकडे सध्या कुठल्याही बातम्या नाहीये. त्यामुळे तुम्ही अशा चर्चा करत आहात, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

काहींना शो करायची सवय

शिंदे सरकार हे इव्हेंट सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावरूनही अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे व शिंदे गटातील आमदारांना चिमटे काढले. अजित पवार म्हणाले, काहींना शो करायची सवय लागली आहे. गणेशोत्सव वर्षानुवर्षे चालत आलाय. मात्र, आतापर्यंत आम्ही कधी कॅमेरे घेऊन फिरलो नाहीत. मात्र, आता एखादा मंत्री गाडीतून कसा उतरतो, गणेशमुर्तींपर्यंत कसा चालत जातो हे सर्व कॅमेऱ्यातून दाखवल जातंय. गणेश भक्तांना असा देखावा करण्याची आवश्यकता नाही. मात्र, काहींना शो करायची सवय आहे. बॉलिवूडमध्ये जसे शो मन होऊन गेले, तसे राजकारणातही शो मन बनत आहेत.

बातम्या आणखी आहेत...