आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबरीच्या वादाने क्रूरकर्मा याकूब पुन्हा चर्चेत:चार्टर्ड अकाउंटंट होता याकूब, भाऊ टायगरमुळे गुन्हेगारी विश्वात एंट्री; बॉम्बस्फोटांचा दोषी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फासावर लटकावून आता 7 वर्षे झाली आहे. मात्र, कबरीसंबंधीच्या वादामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

1993 मध्ये मुंबईत BSE सह 13 ठिकाणी भीषण स्फोट झाले होते. यात तब्बल 257 जणांचा मृत्यू, तर 700हून अधिक जखमी झाले होते. अशा या भीषण हत्याकांडातील दोषी याकूब मेमन नेमका होता कोण? तो भारताच्या ताब्यात कसा आला?, जाणून घेऊयात...

व्यवसायाने होता सीए

याकूब अब्दुल रजाक मेमन हा व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. मेमन कुटुंबात तो सर्वाधिक शिक्षित होता. याकूबने इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याशिवाय तुरुंगात असतानाच 2013 मध्ये एम. ए. इंग्रजीही त्याने केले आहे. बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर तुरुंगात असतानाही त्याने आपले शिक्षण सुरू ठेवले होते.

भावामुळे गुन्हेगारी विश्वात

मेमन कुटुंबातील तब्बल 4 जणांना बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यात प्रमुख आरोपी व याकूबचा मोठा भाऊ टायगर मेमन अद्याप फरार आहे. टायगर मेमन व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे निकटचे संबंध आहेत. टायगर मेमनने आपला भाऊ याकूबलाही या गुन्हेगारी विश्वात ओढले. शेवटी त्याची शिक्षा याकूबला मिळाली. टायगर मेमन व दाऊद इब्राहिमच्या गँगचा आर्थिक व्यवहार याकूब पाहत होता, असे तपासात समोर आले आहे.

कुटुंबाला शिक्षा

याकूबचे वडील क्रिकेट प्रेमी होते. मुंबई लीग संघाकडून ते सामनेही खेळले आहेत. याच क्रिकेटच्या प्रेमामुळे त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचे नाव टायगर पतौडीवरून टायगर मेमन ठेवले. याकूबचा दुसरा भाऊ सुलेमान मेमन याला पुराव्याअभावी जामीन मिळाला आहे. तर, आणखी दोन भाऊ एसा आणि युसूफ हे बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. याकूब मेमनची पत्नी रुबीनाला पुराव्याअभावी जामीन मिळाला आहे.

बॉम्बस्फोटाआधीच पलायन

12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्याच्या एक दिवस अगोदरच 11 मार्च 1993 रोजी याकूबने आपली पत्नी, भाऊ एसा, युसूफ आणि त्यांच्या पत्नीसह भारतातून पलायन केले होते. एवढेच नव्हे तर 10 मार्च 1993 रोजी त्याने आपल्या आई-वडिलांना भारतातून दुबईमार्गे सुरक्षितपणे पाकिस्तानला नेले होते. याकूब मेमनचा भाऊ टायगर मेमनही 12 मार्च रोजीच भारतातून पळून गेला होता. दाऊद इब्राहिमच्या मदतीने तो दुबईत लपला होता. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरूनच टायगर मेमन, याकूब मेमन या आरोपींनी मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले.

दुबईत अटक

याकूब मेमनला दुबईमध्ये जुलै 1994 मध्ये अटक करण्यात आली. भारतात परतण्याबाबत वकिलाचा सल्ला घेण्यासाठी तो बाहेर पडला होता. वकील त्याचे नातेवाईक होते. मात्र, तेव्हाच रॉच्या रडारवर याकूब आला. याकूब दुबईतील आपल्या गुप्त अड्ड्यातून बाहेर पडणार हे समजताच रॉने सापळे रचले. आणि याकूब वकिलाची भेट घेत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले. 24 ऑगस्ट 1994ला भारतीय तपास यंत्रणांनी याकूब मेमनला दुबईहून दिल्लीला आणले.

30 जुलै 2015ला फाशी

मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम आणि याकूब व टायगर मेमन हे प्रमुख दोषी आहेत. तपासात या बॉम्बस्फोटासाठी याकूब याने निधी गोळा केल्याचे व इतर आर्थिक व्यवहार पाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टाडा न्यायालयाने 27 जुलै 2007 रोजी याकूबला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर याकूबने राष्ट्रपतींकडे दयेची याचिकाही केली. मात्र, याकूबवरील गुन्हा हा अतिशय गंभीर आणि दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने ही याचिका पोलिसांनी फेटाळून लावली. वयाच्या जवळपास 53 वर्षी 30 जुलै 2015 रोजी त्याला फासावर लटकवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...