आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संपूर्ण देशात मुंबई कोरोनाग्रस्तांचे हॉटस्पॉट बनले असून रोज १०० च्या वर कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त आणि कोरोनाचे बळी असलेले मुंबई राज्य सरकारच्या चिंतेचा विषय बनले आहे. सामान्य नागरिकांसोबत डॉक्टर, नर्स आणि पोलिस, पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. बुधवारी एका कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातच आत्महत्या केल्याने मुंंबईची स्थिती किती गंभीर आहे ते दिसून येत आहे.
नायर रुग्णालयात एका २९ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. या महिलेने रुग्णालयातील बाथरूममध्येच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. वरळी कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानंतर आता दादर, धारावी, माहिममध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते. बुधवारी दादरमध्ये २, धारावीत ५ व माहिममध्ये एका रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दादरमधील दोन्ही रुग्ण शिवाजी पार्क परिसरातील आहेत. त्यामुळे दादरमधील बाधितांची संख्या २१ झाली आहे. माहिमच्या प्रकाशनगरमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने माहिममधील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर पोहोचली आहे. याबरोबरच भाटिया रुग्णालयातील आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
दारू दुकाने, पानटपऱ्यांत चोऱ्यांची संख्या वाढली
दारू आणि सिगारेटचे व्यसन असलेल्यांना लॉकडाऊनमुळे काही मिळत नसल्याने ते बेचैन झाले आहेत. त्यामुळेच मुंबईत दारूची दुकाने आणि पानटपऱ्या फोडून चोऱ्यांची संख्या वाढल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या २४ तासांत अनेक दुकानांमध्ये चोरी झाली असून २ हजारापेक्षा जास्त किमतीची बटरची पाकिटे, १० हजार रुपये किमतीचे सिगारेट बॉक्स, ८ हजारांपेक्षा जास्त किंमत असलेले बिअर बॉक्स, तंबाखू आणि बिडी पळवल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.