कोरोना संकट: राज्यातील 15 करोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


  • राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 126 वर

प्रतिनिधी

Mar 26,2020 03:05:54 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या 126 झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्या 15 रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता 14 दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील 14 दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काल पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 126 वर

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण कोरोनाने राज्यात चौथा बळी घेतला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही पीडित महिला वाशी येथील रहिवासी होती. सुरुवातीला तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तिचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठवले होते. 24 मार्च त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज या महिलेने उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 126 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 9 जण मुंबईतीलच आहेत. दरम्यान पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

X