आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंबी:कोरोना संकट टळलेले नाही, गर्दी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; सर्वच शहरांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्बंध शिथिल करताच सर्वच शहरांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
  • कोराेनाचा फटका : पावसाळी अधिवेशन २२ जूनऐवजी ३ आॅगस्टपासून

लॉकडाऊनमधून सवलत दिल्यानंतर मुंबईसह राज्यातील शहरांत अचानक गर्दी वाढली आहे. कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. लोकांनी गर्दी टाळावी, अन्यथा नाइलाजाने पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर  राज्यभरातील सर्वच शहरांमध्ये रस्त्यांवर गर्दी वाढली असून दुसऱ्या बाजूला रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही तंबी दिली आहे. 

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.   राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर राखले जाईल हे गृहीत धरून सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र पहिल्याच दिवशी झुंबड उडाल्याचे दिसल्याने वाईट वाटल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

व्यायाम करण्यासाठी सवलत, आरोग्य बिघडवण्यासाठी नाही 

तुम्हाला व्यायाम करता यावा, चालता-फिरता यावे म्हणून सवलत दिली आहे. आरोग्य बिघडवून घेण्यासाठी ही सवलत नाही हे लक्षात असू द्या, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले. लॉकडाऊनमधून दिलेली सवलत जीवघेणी ठरणार असेल तर नाइलाजाने पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण मला खात्री आहे, जनता ती वेळ येऊ देणार नाही, अशी आशा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

पुरवणी मागण्यांसाठी विशेष अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून मुंबईत सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी पार पडली त्यानंतर ते बोलत होते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे अधिवेशन २२ जूनपासून होणार होते. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर नियोजित तारखेपासून अधिवेशन घेणे शक्य नाही. त्यामुळे पुढे ढकलले असून पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास ३ आॅगस्टच्या पूर्वी एक दिवसासाठी सभागृहाची बैठक बोलावण्याचा विचार होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

२४ जुलै रोजी पुन्हा बैठक

पावसाळी अधिवेशन दोन आठवड्यांचे असते. जर का पुरवणी मागण्यांच्या मंजुरीसाठी विधिमंडळाची बैठक एक दिवस बोलावल्यास ३ आॅगस्टपासूनचे अधिवेशन एका आठवड्याचे होईल, असे सूत्रांनी सांगितले. कामकाज सल्लागार मंडळाची पुढची बैठक २४ जुलै रोजी होणार आहे. अधिवेशन पुढे ढकलण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याचा मुख्यमंत्र्यांकडून  इन्कार

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व सचिवांमध्ये कोणतीही खडाजंगी झाली नाही. त्यासंदर्भात आलेल्या बातम्या निराधार आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळ हे राज्याच्या हिताचे काम करत असते. तिथे कुणी मारामाऱ्या करायला येत नाही, कधी कधी ऐनवेळी प्रस्ताव येत असतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंगळवारी  मंत्र्यांना अंधारात ठेवून ऐनवेळी सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडले होते. त्यावर मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नितीन राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.यावरून खडाजंगी झाली तसेच  मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यावर मंत्र्यांनी आगपाखड केल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...