आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रत्येक दिवशी ७०० पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १५ हजार ५२५ वर गेली आहे. १ मे रोजी हीच संख्या ११५०६ होती. म्हणजेच पाच दिवसांत पाच हजारांनी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. १ मे रोजी १००८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर ५ मे रोजीही नव्या आणि जुन्या अशा १ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. मे महिन्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने त्याच प्रमाणात आयसीयू बेडचीही आवश्यकता भासणार आहे. यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती केली आहे.
राज्यातील बेड्सची संख्या ठाऊक असल्यानेच मार्चमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रसार वाढला आणि अधिवेशन गुंडाळण्यात आले तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात ६५० ते ७०० विलगीकरण बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रशिक्षित डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, उपचारासाठी आवश्यक औषधे आणि वस्तूंचीही उपलब्धता करण्यात आली असल्याची माहिती दिली होती. मात्र, आता मे उजाडला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये विलगीकरण बेड योग्य त्या प्रमाणात उपलब्ध झालेच नसल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिव्य मराठीशी बोलताना दिली.
राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक नवे हॉटस्पॉट तयार होत आहेत. केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रुग्णांची संख्या का वाढत आहे याबाबत बोलताना या अधिकाऱ्याने सांगितले, मुंबईत अत्यंत दाटीवाटीची वस्ती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे एका व्यक्तीपासून अनेकांना त्याची लागण होते. कोरोनाचा सध्या सामूहिक संसर्ग झालेला आहे. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यानेच नव्या रुग्णांची माहिती समोर येत आहे. मुंबईतून अनेक जण आपापल्या गावी गेल्याने ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांनी त्या-त्या ठिकाणी त्याचा प्रसार केला असल्याने ही संख्या आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, अशी भीतीही या अधिकाऱ्याने व्यक्त केली. आगामी काळात ६० ते ७० हजार बेड्सची आवश्यकता भासणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
वुहानच्या धर्तीवर बीकेसीला १ हजार बेड्सचे रुग्णालय
बेड्सची अनुपलब्धता लक्षात घेऊन बीकेसी येथे वुहानच्या धर्तीवर एक हजार बेड्सचे तात्पुरते रुग्णालय उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बीकेसी येथे जाऊन या इस्पितळ उभारणीचे काम पाहिले. वरळी एनएससीआय आणि गोरेगाव येथील एनएसई कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, जेजे रुग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, आदी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
हजार लाेकांमागे ०.५ बेड्स
अन्य देशांच्या तुलनेत भारतात एक हजार लोकांमागे फक्त ०.५ बेड आहेत. आर्थिक समन्वय आणि विकास संस्था म्हणजेच ओईसीडीच्या अहवालात हे नमूद आहे. यावरून बेड्सची उपलब्धता किती आवश्यक आहे ते दिसून येत आहे. दक्षिण कोरियात एक हजार लोकांमागे १२.३, चीन ४.३, इटली ३.२ आणि अमेरिकेत २.८ बेड आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.