महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी : मुंबईत 65 वर्षीय महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्गात आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

  • राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले, यातील 9 रुग्ण मुंबईतील आहे 

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 07:24:53 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण कोरोनाने राज्यात चौथा बळी घेतला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही पीडित महिला वाशी येथील रहिवासी होती. सुरुवातीला तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तिचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठवले होते. 24 मार्च त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज या महिलेने उपचारादरम्यान आपले प्राण सोडले.

अपडेट...

> सिंधुदुर्गात हायअलर्ट, 1 रुग्णकोरोना पॉझिटिव्ह. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची माहिती

> परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये आज एका बेघर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


> नागपुरात कोरोना पोझीटिव्ह पाचवा रुग्ण आढळला. एका 42 वर्षीय व्यक्तीली कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णाचा दिल्लीहून परतल्याचा इतिहास असल्याची प्राथमिक माहिती आहे. कामाच्या निमित्ताने दिल्लीला गेला होता,18 मार्चला रेल्वेने नागपूरात आला होता.

> नागपुरातील पहिला कोरोना संक्रमित रुग्ण कोरोना मुक्त. आज या रुग्णाला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथून सुट्टी दिली जाणार आहे. 11 मार्च रोजी या रुग्णाला दाखल करण्यात आले होते व तो पॉझिटिव आढळला होता. हा अमेरिकेहून नागपुरात परतला होता.

> कोरोनाबाधीत 15 रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 127 वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 126 वर पोहोचला आहे. आज नागपुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. काल राज्यात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 9 जण मुंबईतीलच आहेत. दरम्यान पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात कोरोनाचे चार बळी, चारही मुंबईतील प्रकरणे

महाराष्ट्रात मागील आठ दिवसांत तीन कोरोना पॉझिटिव्ह लोकांचा मृत्यू झाला. तिन्ही प्रकरणे मुंबईची आहेत. तिघांचा मृत्यू मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात झाला. सर्वप्रथम 17 मार्च रोजी 64 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता. 22 मार्च रोजी 69 वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू झाला. नंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

राज्यातील कोरोनाग्रस्त :

मुंबई 51, पिंपरी-चिंचवड 12, पुणे 19, सांगली 9, नवी मुंबई 5, कल्याण-डोंबिवली प्रत्येकी 6, नागपूर 5, यवतमाळ 4, नगर, ठाणे प्रत्येकी 3, सातारा, पनवेल प्रत्येकी 2, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण प्रत्येकी 1 तर 4 मृत्यू.

X