आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:तयारीत राहा! राज्यात पुन्हा लॉकडाऊन अटळ, टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती

मुंबई25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • लॉकडाऊनबाबत नियोजन करा : तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश {राज्यात शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेशबंदीचेही निर्देश

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे बेड्स, इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत अाहेत. त्यामुळे मर्यादित काळासाठी लाॅकडाऊन लावण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले अाहेत.

राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी टास्क फोर्स तातडीची बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच राज्यातील टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे अजूनही पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरू आहेत तसेच बाजारपेठांमध्येदेखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही, असे मत व्यक्त करून नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याने लाॅकडाऊन करावे लागेल, त्यादृष्टीने तयारी करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात ट्रेसिंग, टेस्टिंग अधिक गतिमान करणार : ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. अगदी १० ते १८ वयोगटातदेखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्येदेखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मर्यादित दिवसांसाठी लाॅकडाऊन, एसओपी तयार करण्याचे बैठकीत आदेश

 • मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धती (एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी.
 • धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करा.
 • गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा
 • मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई-आयसीयू , व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे
 • शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी
 • विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत
 • सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीतून काम करू द्यावे
 • खासगी डॉक्टरांची सेवा घ्यावी.

टास्क फोर्सने दिली रुग्णवाढीची कारणे

 • वेळेवर चाचणी न करणे
 • रुग्णालयात भरती होण्यास उशीर करणे
 • घरी (होम अायसोलेशन) असताना नियमांचे पालन न करणे

बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडताहेत; प्रधान आरोग्य सचिवांची माहिती
या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.

सहा महिन्यांत सक्रिय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

 • १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. ३१ हजार ३५१ मृत्यूची नोंद.
 • २७ मार्च २०२१ रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण. मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३.
 • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. २७ मार्च रोजी ३५ हजार ७२६ रुग्ण, तर रविवारी ४०,४१४ बाधित आढळले.

या करणार उपाययोजना

 • ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीयसाठी वापरा
 • ऑक्सिजन उत्पादन ८०% वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे.
 • रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी करा. { ई-आयसीयूवर भर देणार
बातम्या आणखी आहेत...