आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:शरद पवारांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह, काही दिवस भेटी-दौरे बंद; घरातील कर्मचाऱ्यांसह एकूण 39 जणांची चाचणी, 9 जणांना संसर्ग

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांच्या संपर्कातील 100 जणांची चाचणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातील कर्मचारी तसेच सोबत काम करणाऱ्या स्टाफमधील एकूण ९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी रॅपिड अँटिजन डिटेक्शन टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. खबरदारी म्हणून ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानांतील संपूर्ण स्टाफची तसेच सुरक्षा ताफ्यातील ३९ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ३ सुरक्षा रक्षक, एक आचारी, एक चालक आणि त्याची पत्नी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९ पैकी सहा कर्मचाऱ्यांचे अहवाल रविवारीच पॉझिटिव्ह आले होते.

चिंतेचे कारण नाही :

पुढचे काही दिवस कोणताही दौरा न करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी शरद पवार यांना केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनीही पुढील चार दिवस कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ते आवश्यक असलेली सर्व काळजी घेत आहेत. चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे टोपे यांनी नमूद केले.

शरद पवारांच्या संपर्कातील १०० जणांची चाचणी

खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसांत पवारांच्या संपर्कात आलेल्या १०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये दररोज कामानिमित्त त्यांच्या संपर्कात येणारे पवारांचे खासगी स्वीय सहायक, सचिव आणि इतर अधिकारी वर्गाचा आणि त्यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही यामध्ये समावेश आहे, असे बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे येथील अधिकाऱ्यांनाही सूचना

शरद पवार यांनी रविवारी पुणे दौरा केला होता. त्यामुळे तिथे संपर्कात आलेल्या लोकांच्याही चाचण्या करण्याची पुणे येथील आरोग्य विभागाला सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...