आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोड:मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी; राष्ट्रवादी, काँग्रेसने हाणून पाडले संपूर्ण लॉकडाऊन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री, प्रशासनाचा 11 दिवस कडक लॉकडाऊनचा होता विचार

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी मुख्यमंत्री व राज्य प्रशासन संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या भूमिकेत होते. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विरोध करत अंशत: लॉकडाऊनच्या निर्णयावर तडजोड केली.

राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ५० हजार, तर मुंबई शहरातील रुग्णसंख्या १० हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मृत्युदरात झपाट्याने वाढ होत आहे. हे सर्व थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य प्रशासन किमान आठ ते ११ दिवस संपूर्ण लॉकडाऊन करावे या भूमिकेत होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. लोकांचे रोजगार पुन्हा जातील, हवे तर निर्बंध कठोर लादा, हाॅटेल, माॅल्स, थिएटर, चाैपाट्या आदी गर्दीची केंद्रे बंद करा, अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. लॉकडाऊनमध्ये जिल्हा वाहतूक बंद होते. परिणामी बाजार समित्या ठप्प होतात. त्यात कृषी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हवे तर रात्रीची संचारबंदी करा, पण संपूर्ण लॉकडाऊन नको, असा सूर राष्ट्रवादीच्याही मंत्र्यांनी लावला. रविवारची बैठक बैठक व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे झाली. या वेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी तर इतर मंत्री आपापल्या निवासस्थानी किंवा मंत्रालयातील कार्यालयात होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सरकारच्या कठोर निर्बंधांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

एकमताने निर्णय घेतल्याचा दावा
विकेंड टाळेबंदीचा निर्णय मंत्री बैठकीत एकमुखाने घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. तर काँग्रेसचा टाळेबंदीस विरोध होता, असे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. सरकारने जनतेच्या मागण्या विचारात घेऊन मिनी लाॅकडाऊनचा सुवर्णमध्य काढल्याचे गृहनिर्माण विकास मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आरोग्याची त्रिसूत्री पाळा, अन्यथा कडक निर्बंध लावणार : अजित पवार
पुणे | बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आढावा बैठकीत बोलताना दिला.

पवार म्हणाले, सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या. अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नागरिकांपर्यंत पोहचून कोरोनाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

तो शब्द टाळण्यात यशस्वी, काँग्रेसची प्रतिक्रिया
माेदींच्या संपूर्ण लॉकडाऊनवर आम्ही कायम टीका करत आलो आहोत. हा विषय भावनिक होता. कारण, त्याचा नागरिकांवर मोठा मानसिक परिणाम होतो. तो संपूर्ण लॉकडाऊनचा शब्द टाळण्यात आम्ही यशस्वी झालो, असे एका काँग्रेसच्या मंत्र्यांने सांगितले. दरम्यान, तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन कामगारांची जबाबदारी उद्योजकांनी घेण्याचे आवाहन केले. याला उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...