भाजपचे आंदोलन / महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे राज्यभर 'माझं अंगण माझं रणांगण' आंदोलन

  • सध्याच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात असंतोष- देवेंद्र फडणवीस

दिव्य मराठी

May 22,2020 02:15:11 PM IST

मुंबई. कोरोना महामारीचे संकट राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीला रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयशी झाल्याचे सांगत राज्यातील भाजपने सरकारविरोधात आंदोलन पुकारले. ठाकरे सरकारविरोधात आपापल्या घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले होते. 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' या आंदोलनात राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला.

कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. संकट मोठे आहे म्हणून सहकार्य करा, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते. आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केले. परंतू, आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलनात सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभे राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

सरकारबद्दल जनतेत असंतोष- देवेंद्र फडणवीस

भाजपचे महाराष्ट्र बचाओ आंदोलन आहे, हे सत्तेवरचे सरकार घालवण्याचे आंदोलन नाही. देशातील 30 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत तर 40% मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ही राज्य सरकारची निष्क्रियता आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले बीकेसी सारखे सेंटर दोन दिवसात भरून जाईल. पाऊस पडल्यावर बीकेसी सेंटरचे काय होईल? असा सवाल त्यांनी केला. केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले पण राज्याने एक दमडीचे पॅकेज दिले नाही, असेही ते म्हणाले. कर्नाटक,मध्य ओदिशा, गुजरात, छत्तीसगडने योजना जाहीर केली. पण एक नवा पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि खा. रक्षा खडसे

भाजपचे आंदोलन निंदनीय - शिवसेना

भाजपचे अशा प्रकारचे आंदोलन करण्याचे केलेले आवाहन हे निंदनीय आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी एकत्रितपणे लढून कोरोनाचा सामना करण्यास सांगत आहेत आणि दुसरीकडे राज्यातील नेते याच गोष्टीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. अशा प्रकारचे आंदोलन झाल्यास लॉकडाऊनला काही अर्थ राहत नाही.

महाराष्ट्रासाठी झटणाऱ्यांचा अपमान- जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

X