आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनची तयारी:ऑक्सिजन प्रकल्प उभारणी, बेड्स सुविधा, रेमडिसिविर उपलब्धतेवर आता भर देणार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससमवेत बैठक; सर्वसमावेशक एसओपी तयार करणार

कोविडच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅँटची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडिसिविर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाइन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडिसिविरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी. डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

एसओपी तयार करणे सुरू
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देताना सुविधा वाढवल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्येसुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पीक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत.

जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसताना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती ( एसओपी) तयार करण्यात येईल. आता आपण लसीकरणात पुढे आहोत, मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत. पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल. आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवण्यावर चर्चा
बैठकीत रेमडिसिविरचा अति व अवाजवी वापर थांबवणेदेखील गरजेचे आहे, असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनीदेखील बोलताना अ[पण रेमडिसिविरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडिसिविरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टनपैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.

टास्क फोर्सने दिल्या सूचना
सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांनादेखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन सुयोग्य दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे आदी सूचना देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...