आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपली सुरक्षा आपल्याच हाती:कोरोनाचा विळखा होतोय घट्ट; राज्यात दहा हजारांवर, औरंगाबादेत 459 रुग्ण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रेकर यांनी पीपीई किट घालून हिंगोलीत कोविड वॉर्डाची पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला. - Divya Marathi
केंद्रेकर यांनी पीपीई किट घालून हिंगोलीत कोविड वॉर्डाची पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात शुक्रवारी १०,२१६ नव्या काेरोना रुग्णांची नोंद झाली तर ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ६,४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. विदर्भात ३६०१ रुग्ण, तर २३ मृत्यू झाले. आतापर्यंत २ लाख ९९४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी मराठवाड्यात ११११ रुग्ण, तर १० जणांचा मृत्यू झाला. आैरंगाबादेत ४५९ तर, जालन्यात २०२, परभणी ४७, हिंगाेली ४६, नांदेड १२८, लातूर १०८, उस्मानाबाद २६, बीडमध्ये ९५ रुग्ण सापडले.

मराठवाड्यातही काेराेनाचा विळखा घट्ट
संपूर्ण राज्याप्रमाणे मराठवाड्यातही काेराेनाचा विळखा घट्ट हाेताना दिसत आहे. दरदिवशी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांत विविध संस्था, शासकीय कार्यालये आणि गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले. रुग्णांना विलगीकरणात ठेवले असले तरी पुढील काही दिवस हा धोका कायम राहणार आहे. लसीकरण होत असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी नागरिक म्हणून आपणाला मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंग यावर भर द्यावा लागणार आहे.

परभणी : आर्वीमध्ये १३ पॉझिटिव्ह सापडले, गावच्या हद्दी केल्या सील
तालुक्यातील आर्वी येथे १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आर्वी ग्रामपंचायत हद्द प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. तालुक्यात रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून गावच्या हद्दी सील केल्या आहेत.

हिंगोली : लस घेतल्यानंतरही पाेलिस जमादारास कोरोनाची बाधा
आखाडा बाळापूर ठाण्यातील एका जमादाराने कोविडची लस घेतल्यानंतरही त्यांचा रॅपिड अँटिजन टेस्टचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. हिंगोली जिल्ह्यात सुमारे ७ हजारपेक्षा अधिक शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोविडची लस दिली आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात आले आहे. मात्र मागील ३ दिवसांपासून एका जमादारास सर्दी, ताप व खोकला येऊ लागला होता.

नांदेड : जि.प.च्या सर्वसाधारण सभेपूर्वी दहा जण पॉझिटिव्ह
शुक्रवारी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा घेण्यात आली. तत्पूर्वी रॅपिड अँटिजन तपासणीत सदस्य, अधिकारी, कर्मचारी मिळून १० सदस्य पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर या सर्वांना आरटीपीसीआर तपासणीसाठी पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्हा परिषदेच्या सभागृहासमोर तपासणी केली जात होती. या वेळी १३९ जणांची तपासणी करण्यात आली. यात सदस्यांसोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

गेवराई : प्राचार्यांसह ८ कर्मचारी आणि १२ विद्यार्थ्यांना लागण
सुरुवातीला एका सहशिक्षकास कोरोनाची बाधा झाल्यानंतर शुक्रवारी गेवराई तालुक्यातील गढी येथील नवोदय विद्यालयात प्रशासनाने केलेल्या अँटिजन टेस्टमध्ये प्राचार्यांसह आठ स्टाफ कर्मचारी व १२ विद्यार्थी कोरोनाबाधीत आढळून आल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. गेवराई तालुक्यातील गढी येथे नवोदय विद्यालय असून सध्याच्या परिस्थितीत १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी निवासी आहेत. दरम्यान, गुरुवारी या विद्यालयातील एका सहशिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर शुक्रवारी विद्यालय प्रशासनाने येथील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची अँटिजन चाचणी घेतली असता प्राचार्यांसह इतर ८ कर्मचारी, १२ विद्यार्थी असे एकूण तब्बल २० जण कोरोनाबाधित आढळून आले.

हिंगोली : विभागीय आयुक्त म्हणाले, आता जनतेने काळजी घ्यायला हवी
जनतेने काळजी घेतली तर मराठवाड्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल. पण निष्काळजीपणा केल्यास यात आणखी वाढ होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी हिंगोली येथे शासकीय रुग्णालय भेटीदरम्यान सांगितले.
केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मात्र योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात आगामी काळात लॉकडाऊन करायचा किंवा नाही याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे निर्णय घेतील. नागरिकांनी काळजी घ्यावी अन् लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...