कोरोना : सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाचा धोका 62 टक्के घटतो, इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्चमध्ये दावा

  • एका बाधित रुग्णाकडून 2 ते 5 व्यक्तींना संक्रमण

दिव्य मराठी

Mar 26,2020 09:53:00 AM IST

मुंबई - सोशल डिस्टन्सिंगमुळे (समाज अंतर) कोरोनाचा धोका तब्बल ६२ टक्क्यांनी कमी होतो आणि साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा तर संक्रमणाचा धोका ८९ टक्क्यांनी कमी होतो, असा दावा इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्च या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनापुढे आाणणाऱ्या पत्रिकेत करण्यात आला आहे.


आसीएमआर संस्थेच्या इंडियन जर्नल आॅल मेडिकल रिसर्च पत्रिकेच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात सदर संशोधन प्रकाशित केलेले आहे. संदीप मंडल, तरुण भटनागर, रमन गंगाखेडकर, स्वरूप सरकार या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणासंदर्भात काही निष्कर्ष मांडले आहेत.


त्यात म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या एका रुग्णाकडून १.५ ते ४.९ व्यक्तींना त्याची लागण होण्याची शक्यता असते. कोविड -१९ चे संक्रमण रोखण्यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगचा निर्णय घेण्यास केलेला एक आठवड्याचा विलंब महागात पडू शकतो. या विषाणूने एकदा समुदायात प्रवेश केल्यास आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो. तसेच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.’


कोविड- १९ विषाणूने बाधित झालेले रुग्ण जेव्हा विमानतळावर उतरतात, तेव्हा त्यांचे ‘थर्मल स्क्रीनिंग’ (ताप मोजणी) केली जाते. पण, कोरोना बाधित असलेले ४६ टक्के प्रवासीी या स्क्रीनिंगमध्ये सापडू शकत नाहीत, असे या संशोधकीय लेखात म्हटले आहे.


जानेवारी २०२० पासून एकट्या मुंबईच्या विमानतळावर ३ लाखांपेक्षा अधिक परदेशातून प्रवासी उतरले आहेत. या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग केली असली तरी त्यातील हजारो प्रवासी कोरोनाबाधित असूनही क्वारंटाईन न करता फिरण्याची शक्यता आहे.


चार शहरांची भूमिका निर्णायक

भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूरू या चार शहरात मोठ्या संख्येने हवाई प्रवासी येत असतात. भारतात कोविड-१९ चे संक्रमण होण्यास या चार शहरांची मोठी भूमिका असू शकते, असा निष्कर्ष या लेखात मांडण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लुएचओ ) माहितीनुसार, कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी कोरोना विषाणूची साखळी तोडली गेली पाहिजे, असा इशारा या लेखात देण्यात आलेला आहे.

X