आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्होकलिस हेल्थ केअर उपक्रम रविवारी सुरू झाला. या यंत्रणेद्वारे संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या उपक्रमाचा रविवारी प्रारंभ केला.
या कल्पक तंत्रज्ञानामुळे मुंबईतील कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट होईल. रुग्णावर उपचार करण्यास होणारा विलंब वाचणार असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. ३० मिनिटांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान होणार आहे. या चाचणीत जे रुग्ण सकारात्मक आढळतील त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून निदान पक्के केले जाणार आहे.
मुंबईत दैनंदिन ७५०० कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होतात. त्यातून १४०० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळतात. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास ४८ तास लागतात. त्यामुळे रुग्णावरील उपचारास विलंब होतो.
काय आहे तंत्रज्ञान
एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतात तेव्हा त्यास श्वसनाचा त्रास होतो. या सर्व प्रक्रियेमध्ये फुप्फुसाच्या स्नायूंवर ताण पडत असतो. परिणामी स्नायूंना सूज येते. त्यामुळे आवाजही बदलतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात विशिष्ट बदल होतो. याच बदललेल्या आवाजाचे परीक्षण या चाचणीत करण्यात येते. त्यातून त्या व्यक्तीला कोरोना झाला की नाही हे समजू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.