कोरोना : राज्यात लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

  • डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार! गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल - अजित पवार 

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 12:28:23 PM IST

मुंबई - ‘कोरोना’ प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना दुर्दैवी आहेत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणं आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

नागरिकांची खरेदीसाठीचा गर्दी होणे, कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक

राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी, दुध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीनं गर्दी करत आहेत. सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे.

प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या घोषणेचे स्वागत


केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात टोलमाफी केली आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यास उशीर होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरींनी घेतलेल्या या निर्णयाचे अजित पवारांनी स्वागत केले आहे.

X