आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात शनिवारी २८५ केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करतील. राज्यात सकाळी ९ वाजता मोहिमेची सुरुवात होऊन ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी मुंबईमधील कूपर रुग्णालय आणि जालना जिल्हा रुग्णालयातील केंद्रात लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधतील. महाराष्ट्राने याआधी ५११ लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन केले होते. पण गेल्या आठवड्यात टोपे व केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील बैठकीनंतर ही संख्या ३५० केली. मात्र, नेटवर्क व इतर अडचणींमुळे ही संख्या घटवून २८५ करण्यात आली.
गर्भवती महिलांचे लसीकरण नाही
पुणे | कोरोनासदृश लक्षणे, प्लाझ्मा दिलेले व कोरोनासह इतर कारणामुळे गंभीर आजारपण वा आयसीयूत उपचार झालेल्यांना ८ आठवड्यांच्या आत लस देऊ नका, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. कोरोनासदृश लक्षणे, गंभीर आजारी व प्लाझ्मा दिलेल्यांना ४ ते ८ आठवडे झाल्यानंतर लस देण्यात यावी. गर्भवती महिला किंवा गर्भवती असल्याची शक्यता असलेल्यांना डोस देऊ नये, असे म्हटले आहे.
... तर राखीव लोकांचेही केले जाणार लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जगातील सर्वात मोठ्या पहिल्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारपासून होत आहे. ३ हजार केंद्रांवर लसीकरण होईल. आधी संबंधितांची लेखी सहमती घेऊन सहमती पत्रही भरून घेतले जाईल. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त काहींची नावे राखीव ठेवली आहेत. मुख्य यादीतील लोक आले नाहीत तर राखीव लोकांना लसीकरणासाठी बोलावता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व लोकांना मोबाइलवर संदेश पाठवला जाईल. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना बोलावले जात आहे. यादीत समावेश असलेल्या एकाही व्यक्तीला लसीकरण केंद्रावरून परत पाठवले जाणार नाही.
कोणत्या लसीचे काय साइड इफेक्ट होऊ शकतात
- कोविशील्ड : लस टोचल्याच्या ठिकाणची जागा नरम पडू शकते. वेदना, थकवा, स्नायूंत वेदना, अस्वस्थता, सांधेदुखी, थंडी वाजणे आणि अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
- कोव्हॅक्सिन : लस टोचल्याच्या ठिकाणी वेदना, डोकेदुखी, थकवा, ताप, शरीर-पोटात वेदना, अस्वस्थ वाटणे, उलटी-चक्कर येणे, घाम येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसू शकतात.
मुंबईत व्हॅक्सिनचे औक्षण!
राज्यभरात शनिवारपासून कोराेना लसीकरणास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना लसीची पूजा करून सर्वांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.