आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा इशारा:'आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पाडू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल चालकांना दिला शेवटचा इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

राज्यभरात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. तसेच लॉकडाऊन करून सगळं बंद करणे आम्हालाही नकोय पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असे ते यावेळी म्हणाले.

स्वयंशिस्त खूप महत्त्वाची
पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी आपणास सांगितले. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...