आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुंबईतील 50% बालकांना होऊन गेला कोरोना; सर्वाधिक 10 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिकेच्या सिरो सर्वेक्षणातील माहिती, 2,176 नमुन्यांचे संकलन

कोविड विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लहान मुलांचे रक्तनमुनेविषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड प्रतिपिंड (अँटिबाॅडीज) विकसित झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याचा अर्थ ५० टक्के बालके या लाटेत कोरोनाच्या संपर्कात आली होती. यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत प्रतिपिंड असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असून ही बाब समाधानकारक मानली जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे रक्तनमुनेविषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण राबवले. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २ हजार १७६ अनोळखी रक्तनमुने संकलित करण्यात आले. मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. पैकी, महानगरपालिकेच्या प्रयोगशाळांतील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळांतील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत.

वय वर्षे १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये वय वर्षे १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटात सुमारे ३९.०४ टक्के इतक्या मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. त्या तुलनेत आता प्रतिपिंडे असलेल्या मुलांची टक्केवारी वाढली आहे. याचा अर्थ दुसऱ्या लाटे दरम्यान १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुले, बालके पहिल्या लाटेपेक्षा मोठ्या प्रमाणात कोविड विषाणूच्या सान्निध्यात आली होती.

१ ते १८ वयोगटाखाली सरासरी ५१ टक्के बालकांमध्ये अँटिबॉडीज
वयोगटानुसार विचार करता १ ते ४ वयोगटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी या संपूर्ण वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते.


बातम्या आणखी आहेत...