आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध:डेल्टा प्लस व तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे नियमांत केला बदल; इतर दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंत खुली, शनिवार-रविवार मात्र बंद

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • स्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना टप्प्यांत बदल करण्याचा अधिकार

राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे ४ ते ६ आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. ४ जूनला अनलॉकबाबत ५ टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश जारी केले आहेत.

यानुसार सर्व प्रशासकीय क्षेत्रांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी निर्देशांक व ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा.जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार असतील. निर्बंधात घट-किंवा वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घ्यावा लागेल.

दुसरी लाट ओसरली नाही; ९०% रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा
नवी दिल्ली | केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. देशात ७५ जिल्ह्यांत अजूनही संक्रमणाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक, तर ९२ टक्के जिल्ह्यांत ५ ते १० टक्क्यांपर्यंत आहे. देशात नव्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण एकट्या डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. एनसीडीसीचे संचालक सुजित सिंह म्हणाले, १८ जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सर्वाधिक २२ रुग्ण आहेत.

राज्यात डेल्टा प्लसचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात
रायगड | राज्यात कोरोनाच्या अतिघातक डेल्टा प्लस या व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू १३ जूनला झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील या ८० वर्षीय महिलेला इतरही आजार होते.

 • यापूर्वी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये डेल्टा प्लसचे दोन रुग्ण होते. यातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात मरण पावलेली ही वृद्धा डेल्टा प्लसमुळे मृत्यू होणारी भारतातील दुसरी रुग्ण ठरली आहे.

सावधान महाराष्ट्र ! तिसऱ्या लाटेत ५० लाख रुग्णांचा अंदाज
मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यात ५० लाख रुग्ण आढळतील, असा खळबळजनक अंदाज वर्तवला आहे. त्यातील २५ लाख रुग्णांना सरकारी वैद्यकीय सुविधा देण्याची तयारी विभागाकडून करण्यात येत आहे. या लाटेत तब्बल ५ लाख बालकांना कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ताेंड देण्यासाठी सतर्क झाले आहे. आवश्यक प्रमाणात औषधे आणि उपकरणे साठवून ठेवण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी खरेदी धोरणांत बदल करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे सादरीकरण गृहितकांवर आधारित आहे. तसेच टास्क फोर्सच्या सूचनेनुसार यात सुधारणा करण्याबाबत आरोग्य विभाग तयारी करत असल्याचे राज्याचे आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी यांनी सांगितले आहे.

४ जूनच्या आदेशामधील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध असे
अत्यावश्यक दुकाने व सेवा रोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.

 • माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल. खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील. लग्नसोहळ्यांना ५० लाेकांची, तर अंत्यविधीला २० लोकांची मर्यादा असेल. ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.

दोन्ही लस प्रभावी
दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या अल्फा, बिटा, गॅमा व डेल्टा व्हेरिएंट्सवर कोविशील्ड-कोव्हॅक्सिन या लसी परिणामकारक आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक २२ रुग्ण

 • महाराष्ट्र- २२
 • तामिळनाडू - ९
 • मध्य प्रदेश- ७
 • केरळ- ३
 • पंजाब -२
 • गुजरात- २
 • आंध्र प्रदेश- १
 • ओडिशा- १
 • राजस्थान -१
 • कर्नाटक - १

बातम्या आणखी आहेत...