आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Corona Virus Update| Video Conference By CM People's Representatives Should Cooperate, Discipline Is Needed In Aurangabad: CM Uddhav Thackeray

सर्वपक्षीय व्हीसी:लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, औरंगाबादेत शिस्त हवी : मुख्यमंत्री

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • राज्यात रुग्ण व मृतांची संख्या दडवण्याचे प्रकार होत आहेत : फडणवीस

लाॅकडाऊन असूनही नागरिक शिस्त पाळत नसल्याने औरंगाबाद आणि मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा मुद्दा गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत चांगलाच गाजला. बेशिस्तीबद्दल मुख्यमंंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद व मालेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्रात शिस्त ठेवण्याची गरज आहे, असे सांगून तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, औरंगाबादेतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. मनपा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्सची वानवा आणि घाटीत कमी मनुष्यबळ कमी आहे, याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची टीका करून रुग्ण व मृतांची संख्या दडवण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. ते म्हणाले, केंद्र राज्य सरकारला खूप सहकार्य करीत असून पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. आपण प्रसंगी टीका करीत असू, पण त्यात आपला उद्देश उणिवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो. कोरोनाचे संकट घालवण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच इतर नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मनपा रुग्णालयात कमी वेतनामुळे तज्ज्ञ डॉक्टरच येत नाहीत : इम्तियाज जलील

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबादेत ३ मोठी खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव आहे. मनपाने ४ कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधले. पण कमी वेतनामुळे कामासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स येत नाहीत. १४ कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे, पण मनुष्यबळ नाही. दारू दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत. रेशन कार्ड नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही.

२५ हजार मेट्रिक टन ज्वारी खरेदी : अजित पवार

ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही. कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरू आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मनसेप्रमुख राज ठाकरे मास्कविना मंत्रालयात

मुंबईत मास्क लावणे बंधनकारक असताना राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात अाले. तुम्ही सगळ्यांनी मास्क लावले आहेत म्हणून मी लावला नाही, असे ते म्हणाले. मास्क न लावल्यास एक हजार रुपये दंड आहे. हा दंड राज यांच्याकडून घेणार का, असा प्रश्न मंत्रालयात विचारला जात होता. बैठकीसाठी विनामास्क अालेल्या राज ठाकरेंनी परप्रांतीयांना तपासणीिशवाय प्रवेश देऊ नका असा सल्ला दिला, हे विशेष.

हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोबल खचले : देवेंद्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात पोलिसांवर हल्ले, आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे मनोबल खचले. आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. कोरोना नसलेल्या रुग्णांचेसुद्धा हाल होत आहेत. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण तसेच मृतांची संख्या दडवण्याचे प्रकार अतिशय गंभीर आहेत, याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना करून अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नाही. अशा प्रसंगी राजकीय नेतृत्वाने हा समन्वय घडवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मातोश्री, फडणवीस मंत्रालयातून सहभागी

या व्हीसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून तर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले. तसेच मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासप नेते महादेव जानकर, शेकाप नेते जयंत पाटील, एमआयएम नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते सहभागी झाले.