आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विमा संरक्षण:कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्थांना 25 लाख रुपये विम्याचे संरक्षण; कोरोनाचे गांभीर्य पाहून मुदत वाढवणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था-संघटनांचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे समाजामध्ये विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला तर कुटुंबातील कुणालाही त्याचे अंत्यदर्शन होऊ शकत नाही तसेच अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. हे चित्र फार हृदयद्रावक आहे. अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार उदा. दहन, दफन करणाऱ्या व्यक्ती आपल्या व कुटुंबीयांच्या काळजीने अंत्यसंस्कार विधी करण्यास घाबरतात. अशा वेळी शासकीय सेवेत नसलेले परंतु या संकटाच्या काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही सामाजिक संस्था-संघटनांचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही त्यातून कोरोना संसर्गाचा धोका असून त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील या धाडसी कोरोना योद्ध्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात येईल. कोरोनासंदर्भातील गांभीर्य, परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये आवश्यक

संबंधित सामाजिक संस्था-संघटनांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कर्मचारी त्याच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.

0