महाराष्ट्रात कोरोना LIVE: राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 122; मुंबईत 4, तर सांगलीत 5 नवे रुग्ण सापडले

  • पुण्यातील पहिले 5 कोरोनाग्रस्त ठणठणीत; रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची परवानगी
  • रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या रुग्णालयांचे परवाने रद्द करू, राज्यमंत्र्यांचा इशारा

वृत्तसंस्था

Mar 25,2020 07:15:27 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. त्यांना मुंबई येथे कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 10 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर सोमवारी राज्यात 8 कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले होते.

अमरावतीचे सर्व 68 तपासणी अहवाल निगेटिव्ह

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत असून, अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह तपासणीत आढळून आला नाही. कालपर्यंत पाठविण्यात आलेेल्या 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पाच अहवाल प्रलंबित आहेत.

डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवू नये, राज्यमंत्र्यांनी दिला परवाना रद्द करण्याचा इशारा


कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. त्यांनी आप-आपले खासगी क्लिनिक आणि रुग्णालये सुरू ठेवावीत असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तर खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

मुंबईत 4 नवे रुग्ण सापडले, कस्तुरबा रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रात कोरोनाचे 4 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या बुधवारी वाढली आहे. हे सर्वच रुग्ण मुंबईचेच आहेत. त्यांच्यावर येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चार जणांनी कुठे प्रवास केला होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राज्यात कोरोनाची लागण झालेले पहिले कपल घरी पोहोचले


तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात सर्वात आधी सापडलेले 5 कोरोनाग्रस्त आता बरे झाले आहेत. त्या पाचही रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत गेली. आता त्यांचे स्वॅब सॅम्पल चाचणीसाठी पाठवले असता पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापैकी दोन रुग्णांना गुढी पाडवाच्या निमित्ताने घरी पाठवले आहे. राज्यात कोरोनाची लागण सर्वप्रथम ज्यांना झाली होती, ते हेच कपल होते. तर उर्वरीत तीन जणांना उद्या अर्थात गुरुवारी डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

X