आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यसभा निवडणूक:10 आमदारांचे क्रॉस व्होटिंग, सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहाव्या जागेची उमेदवारी, अपक्षांच्या डरकाळ्या आणि तीन मतांवरून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत रात्री उशिरापर्यंत खोळंबलेली मतमोजणी अशी नाट्यमय वळणे घेत रंगलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत आपला तिसरा उमेदवार अर्थात धनंजय महाडिक निवडून आणला. महाआघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित शक्तीच्या जिवावर मैदानात उतरलेले शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.

शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी मतांच्या कोट्याचा विचार करता अपेक्षित विजय मिळवला. परंतु सहावा उमेदवार देऊन भाजपने निवडणुकीत वाढवलेली उत्सुकता शुक्रवारी पहाटे मतमोजणी संपेपर्यंत ताणलेली राहिली. या मतदानासाठी पोलिस कोठडीत असलेले आघाडी सरकारचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याने २८५ आमदारांनी मतदान केले. शिवाय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.

विधान परिषद निवडणुकीवर परिणाम
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा झालेला विजय व शिवसेनेचा पराभव पाहता २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिव्य मराठी विश्लेषण
भाजप आघाडीकडे ११२ मते होती. त्यात भाजपचे १०६ तसेच जनसुराज्य पक्ष आणि मनसे १ आणि ४ अपक्ष यांचा समावेश होता. भाजपच्या पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची ४८-४८ तर धनंजय महाडिक यांना २६ मते मिळाली. ही एकूण मते होतात १२२. भाजपने संख्याबळापेक्षा १० मते जास्त आणली. बविआची ३, रासपचे १ तसेच ६ अपक्षांची मते भाजपला मिळाली असावीत, असे दिसते. दुसऱ्या फेरीत ४१४० मत मूल्य घेऊन महाडिक यांनी ४०५८चा कोटा पूर्ण केला.

दुसऱ्या फेरीचे गणित : गोयल यांना ४८ मते मिळाली. मतमूल्य होते ४८००. महाडिकांना आवश्यक ४०५८ मते वजा केल्यास शिल्लक राहतात ७४२ मत मूल्ये. त्याला ४८ ने भागले असता १५.४५ मते महाडिक यांना मिळाली. त्याला गोयल यांच्या ४८ मतांनी गुणल्यास मत मूल्य होते ७२०. हे ७२० आणि बोंडे यांची ७२० मत मूल्ये तसेच महाडिक यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांचे मूल्य २७०० असे एकूण ४१४० मत मूल्य (४१.४० मते) घेऊन महाडिक विजयी झाले.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
संजय पवारांच्या पराभवाबद्दल विचार करता या पराभवाचे गणित समजून घ्यावे लागेल. कुणाची मते फुटली याबाबत अभ्यासाअंती मांडणी करू. कुठेतरी चुकले असल्याशिवाय असे होणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी नाही.

यशोमती ठाकूर, मंत्री, काॅंग्रेस
महाराष्ट्रात भाजपने जसे गढूळ वातावरण तयार केले आहे तसाच गोंधळ राज्यसभेसाठी झालेल्या मतदान केंद्रातही घालण्याचा प्रयत्न केला. पण आमचे महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार सहजपणे निवडून येतील हा विश्वास होताच.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
निवडणूक लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली हाेती. आजारी असतानाही मतदानाला आलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना हा विजय समर्पित आहे. नवाब मलिकांनी मतदान केले असते तरी आम्हीच जिंकलो असतो.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पहिल्‍या क्रमांकाच्‍या मतानुसार आम्‍हीच जिंकलो आहोत. भाजपने जागा जिंकल्‍या असल्‍या तरी ते विजयी नाहीत. काही अपेक्षित बाहेरची मत न पडल्‍यामुळे आम्‍ही संजय पवार यांची जागा गमावली. निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय ?

सुहास कांदे यांची प्रतिक्रिया
मत बाद होण्‍याविषयी सुहास कांदे यांना विचारणा केली असता, कांदे असे म्‍हणाले की, माझे मत बाद झाले याविषयीचा आतापर्यंत तरी माझ्याकडे पुरावा आला नाही. परंतु हे जर खरे ठरले तर मी कोर्टात जाणार असल्‍याची प्रतिक्रिया त्‍यांनी दिली आहे.

सुहास कांदे यांचे मत बाद
शिवसेनेच्‍या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्‍याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

का झाले सुहास कांदे यांचे मत बाद ?
निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्‍यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्‍याचे व्हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसते. म्‍हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...