आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते नारायण राणे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे की सातारचे उदयनराजे भाेसले यापैकी कोणाला संधी मिळणार, याविषयी राजकीय वतुळात मोठी उत्सुकता आहे. शिवसेनेचे विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय हाडवैरी राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेविरोधात वापर करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे अडगळीत पडलेल्या राणेंची ‘लॉटरी’ लागण्याची शक्यता आहे.
राज्यातून नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत, तर रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे तीन राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडी स्थापन करताना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीमाना दिलेला होता. राज्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांकडे एकेका मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे. राज्यातून एका खासदाराची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बीडच्या खासदार व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, काँग्रेस ते भाजपचे राज्यसभा खासदार असा प्रवास केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेने युती करताना राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लावायची नाही, अशी भाजपला अट घातली होती. त्यामुळे राणे यांचे पुनर्वसन रखडले होते. नंदुरबारच्या खासदार व आदिवासी महिला नेत्या हिना गावित आणि सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे केंद्रीय मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातून संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे असे दोनच मराठा मंत्री आहेत. मराठा आरक्षणाचा विषय सध्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मराठा की बिगर मराठा खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची लाॅटरी लागते याविषयी मोठी उत्सुकता आहे.
दिल्लीला येण्याचा निरोप नाही : खासदार नारायण राणे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राणे दिल्लीला रवाना झाल्याच्या वावड्या सोमवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांनी उठवल्या होत्या. मात्र ‘मी सध्या तरी मुंबईतच आहे, अापल्याला दिल्लीला येण्याचा निरोप नाही,’ असे स्पष्ट करून राणेंनी या वावड्यांना पूर्णविराम दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.