आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रावर 'तौक्ते' वादळाचे सावट:मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद; किनारपट्टी भागातील गावकऱ्यांना केले जात आहे स्थलांतरीत

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलिबागच्या समुद्रात 15 बोटी अडकल्या

महाराष्ट्रातील दक्षिण समुद्री किनाऱ्यांवर 'तौक्ते' वादळाचा धोका आजही कायम आहे. 18 मे रोजी गुजरातच्या किनारपट्टी भागात हे वादळ धडकणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यापूर्वी याचा कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई आणि पालघर या किनारपट्टीच्या भागासह कोकणातील काही भागात परिणाम होऊ शकतो. वादळादरम्यान या भागात ताशी 175 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.

किनारपट्टीच्या भागात होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागातील जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी विशेष दक्षता व चक्रीवादळासाठी तयार राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात असलेल्या गावकऱ्यांनाही स्थलांतरित केले जात आहे.

अलिबागच्या समुद्रात 15 बोटी अडकल्या
दरम्यान, अलिबागमधून मासेमारीसाठी 15 बोटी अजूनही समुद्रात असल्याची माहिती समोर येत आहे. वादळाचा धोका लक्षात घेता शुक्रवारीच सर्व बोटींना परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रायगडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना किनारपट्टीवरील सर्व तालुक्‍यांच्या तहसीलदारांना किना-यावर राहणाऱ्या ग्रामस्थांना हलवण्याची संपूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व कोविड सेंटर्सला सुरक्षित करण्याचे काम सुरू
कोकण आणि मुंबईच्या समुद्री भागातून तौक्ते जाणार असल्याची शक्‍यता लक्षात घेता मुंबईतील सर्व जंबो कोविड केंद्रे व इतर कोविड केंद्रे सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. कोविड सेंटरच्या तंबू बळकट करण्याबरोबर आजूबाजूच्या झाडांच्या फांद्याही छाटल्या जात आहेत. तसेच सभोवतालच्या झाडामुळे ऑक्सिजन टँकचे नुकसान होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम होण्याची शक्यता नसली तरी, महापालिकेने अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

चक्रीवादळाचा मुंबईत कमी परिणाम असूनही आम्हाला कोविड केंद्रांची सुरक्षा बळकट करायची आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना कोविड सेंटर सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काकणी म्हणाले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास रुग्णांना कोविड केंद्रातून हलवण्याच्या सूचनाही या यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्गातही 38 गावातील लोकांना हलवण्यात येत आहे
चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील किनारपट्टी भागात असलेल्या 38 गावांमधील लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चक्रीवादळाचा परिणाम येथील किनारपट्टी भागात 2 दिवसांपर्यंत होऊ शकतो.

वांद्रे वरळी सी लिंक पुढील 2 दिवस बंद आहे
तौक्तेचा धोका लक्षात घेता वांद्रे-वरळी सी लिंक दोन दिवस बंद आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पुढील 2 दिवस लोकांना मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मच्छीमारांनाही आपली बोट समुद्रात न नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध समुद्रकिनार्‍यावर सुमारे 100 लाइफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय अग्निशमन दल आणि NDRF ची टीमही सतर्क झाली आहे.

आज वाढू शकते तौक्ते ची गती : हवामान विभाग
दरम्यान भारतीय हवामान विभागाने ट्विट करत म्हटले की, तौक्ते सध्या लक्षद्वीपमध्ये सक्रिय आहे आणि याची गती आज वाढू शकते.

IMD ने ट्विट केले, 'तौक्ते'मुळे लक्षद्वीप क्षेत्र आणि या नजिकच्या दक्षिण-पूर्व आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रावर दबाव आला आहे. हे दक्षिण गुजरात आणि दीवच्या किनाऱ्यांना धडकेल. हे 17 मेपर्यंत धोकादायक रुप घेऊ शकते आणि या दरम्यान याचा वेग 150 ते 160 किलोमीटर ताशी राहील.

हवामानशास्त्रज्ञ काय म्हणतात?
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, आज आणि उद्या अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात, तर उत्तर-पूर्वेकडील भागात 17 मे रोजी उंच लाटा वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये असलेले चक्रीवादळ तौक्तेचा उत्तर-पश्चिम दिशेने प्रभाव असेल आणि ते 18 तारखेला सकाळी गुजरात किनाऱ्यापर्यंत पोहोचेल. गुजरातच्या किनारपट्टीमध्ये जोरदार आणि खूप जास्त पाऊस सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात होण्याची शक्यता आहे. यासह, महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटक येथे जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र अशांत राहिल, मासेमारांनी समुद्रात जाऊ नये. आम्ही प्रत्येक तीन तासाला याचा अभ्यास करत आहोत असेही ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...