आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळग्रस्त भागांची पाहणी:​​​​​​​सततची वादळे पाहता कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर तर दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय : ठाकरे

रायगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे गरजेचे

वादळग्रस्तांना योग्य ती मदत देऊ, त्याबरोबरच दरवर्षी येणारी वादळे लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यात सांगितले. दहावी-बारावी परीक्षेबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.

भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे गरजेचे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. मालवणमध्ये त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, येथील लोक गेली २-३ वर्षे वादळांचा धोका अनुभवत आहेत. वादळांविरुद्ध कायमस्वरूपी आराखडा पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मंजुरी किंवा आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा. भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारा यासारख्या गोष्टी या कायमस्वरूपी करणे गरजेचे झाले आहे. वादळाचा वेग, तीव्रता कमी करू शकत नाही. त्यामुळे नुकसान कमी कसे होईल यादृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम अहवाल आल्यानंतर योग्य ती मदत जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दहावी-बारावी परीक्षेबाबत दाेन दिवसांत निर्णय : दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याबाबतही ते म्हणाले, दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेऊ. एक-दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये शिथिलतेचे संकेत
सिंधुदुर्गमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले. ते म्हणाले, लॉकडाऊन कधीही उठू शकतो, पण आपण सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे त्यातील ७० टक्के लोकांना लक्षणे नाहीत. तरीदेखील बेड कमी पडत आहेत. ती टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा, असे ठाकरेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...