आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने ठेवलेला पोपट मेल्याचे जाहीर करण्याचे काम विधानसभाध्यक्षांकडे सोपवले आहे. सरकारला मिळालेले जीवदान तात्पुरते आहे. अध्यक्ष आपल्या परीने निर्णय घेतील. अध्यक्षांनी उलटसुलट केले तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. पण लोकशाहीत शेवटी जनतेच्या न्यायालयात जाऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (१२ मे) पत्रकार परिषदेत दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेचा तत्काळ निर्णय घ्यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.
उद्धव म्हणाले, की मी राजीनामा दिला नसता तर परत मुख्यमंत्री करता आले असते असे न्यायालयाने म्हटले आहे. पण मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे. मी नैतिकतेला जागून राजीनामा दिला. लोकशाहीत जनतेचे न्यायालय शेवटचे असते. याचा फैसला करण्यासाठी जनतेत जावू. जनता जो निकाल देईल तो स्वीकारू. ते पुढे म्हणाले, शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून दावणीला बांधण्याचा भाजपाचा डाव सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. काल काहींनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपाचा आनंदोत्सव समजू शकतो. कारण त्यांना डोईजड झालेले ओझे दूर करण्याचा मार्ग न्यायालयाने दाखवून दिला.
माजी मंत्री अनिल परब यांनी केली मांडणी
माजी मंत्री अनिल परब यांचीही पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. त्यांनी न्यायालयाच्या निकालाचा त्यांना उलगडलेला अर्थ अतिशय तपशिलात आणि मुद्देसूदपणे समजावून सांगितला. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना सुनील प्रभू यांचाच व्हीप योग्य असल्याचे मान्य करावे लागणार आहे. ही सुनावणी त्यांनी तत्काळ घेतली पाहिजे.
प्रभू यांचा व्हीप लागू; शिंदेंची निवड अवैध
अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे पाठवताना कोर्टाने चौकट घालून दिली. व्हीप कुणाचा हेही स्पष्ट केले. उल्लंघन झाले तर आमदार अपात्र होतो. गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर ठरवली. सुनील प्रभूंनी दोन व्हीप जारी केले होते. ते सर्वांना लागू होतात. परिशिष्ट दहाच्या विरोधात अध्यक्षांनी काम केले. त्यामुळे शिंदेंची निवड अवैधच असे ठाकरे म्हणाले.
राजकीय साडेसाती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे शनीदेवाच्या चरणी नतमस्तक
शनिशिंगणापूर | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी शनिशिंगणापूर येथे शुक्रवारी शनिदर्शन घेतले. शनी चौथऱ्यावर जाऊन विधिवत तेल अर्पण केले. दर्शन केल्यानंतर शनिशिंगणापूर येथे अनेक परप्रांतीय भाविकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले. यानंतर ठाकरे यांनी शिर्डीत जाऊन साईंबाबांचे सपत्नीक दर्शन घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.