आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक:मुंबईतील मृतांच्या आकड्यात घट; मनपाने बदलले तपासणीचे निकष 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात दिवसभरात आढळले ६५ रुग्ण, पाच मृत्यू

गेल्या काही दिवसांमध्ये दिवसाला २०० च्या आसपास नव्या कोरोना रुग्णांची नोंद मुंबईत होत होती. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही संख्या कमी कमी होत असताना दिसत आहे. गुरुवारी १०७ नव्या रुग्णांची मुंबईत नोंद झाली असून मृतांचा आकडाही कमी होऊन ३ वर आला आहे. गुरुवारी मुंबईतील अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या दोन हजारचा टप्पा पार करून २०४३ वर गेली आहे. आणि एकूण मृत्यूंचा आकडा ११६ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांच्या तपासणीचे निकषही मनपाने बदलले आहेत.

आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलीला कोरोना झाला असून अधिकारी आणि त्याच्या मुलाची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. सुरक्षिततेसाठी या दोघांना क्वाॅरंटाइन करण्यात आले असून इतर सहकाऱ्यांनाही लागण झाली असण्याच्या शक्यतेने अग्निशमन दलाच्या हेडक्वार्टरचे दोन मजले क्वाॅरंटाइन करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली जात असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात आहे.

मुंबईतील जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, के पश्चिम, एच पूर्व, एम पूर्व, आणि के पूर्व  या आठ वॉर्डांमध्ये आतापर्यंत प्रत्येकी १०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एल वॉर्डमध्ये ८५ पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त असल्याने या वॉर्डांची नोंद अतिगंभीर प्रभागांच्या यादीत करण्यात आली आहे. धारावीत कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्णांची संख्या ८६ वर गेली आहे. धारावीतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. वरळी-कोळीवाड्यात मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. वरळी कोळीवाड्यातील क्वाॅरंटाइनमध्ये असलेल्या १२९ हायरिस्क काँटॅक्टमधील रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

तपासणीचे नवे निकष

मुंबईत आता सरसकट तपासणी करण्याऐवजी हाय रिस्क संपर्कात असलेल्यांपैकी ज्यांच्यामध्ये  कोविड-१९ ची लक्षणे दिसतील, त्यांचीच चाचणी केली जाणार आहे. यापूर्वी सगळ्यांची तपासणी केली जात असे. हाय रिस्क संपर्कात आलेल्यांची लगेचच तपासणी केली जाणार नसली तरी त्यांना क्वाॅरंटाइन करण्यात येणार असून जर एखाद्यात कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याची तपासणी केली जाणार आहे. या नव्या निकषामुळे लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तावर प्राधान्याने उपचार केले जणार असल्याचे सांगण्यात आले.

पुणे : पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात ५१८ रुग्ण

विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१८ झाली आहे. ॲक्टिव्ह ४०४ आहेत. यापैकी पुणे जिल्ह्यात ४६३ बाधित रुग्ण त्यापैकी ४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात ११ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. तसेच असून ८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात १२ बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात २५ जणांना घरी सोडण्यात आले.  कोल्हापूर जिल्ह्यात ६ बाधित रुग्ण आहेत. दरम्यान, पुण्यात गुरुवारी ६५ नवे रुग्ण आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव : न्यूमाेनियाने मृत्यू; दाेघांचा अहवाल निगेटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काेराेना रुग्णालयात बुधवारी न्यूमाेनियाने मृत्यू झालेल्या दाेघाही रुग्णांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. दाेघांचा अहवाल हा निगेटिव्ह अाला अाहे. दरम्यान, गुरुवारी नव्याने ८ काेराेना संशयितांना दाखल करण्यात अाले. त्यामुळे अाता एकूण संशयित रुग्णांची संख्या २६६ वर पाेहचली अाहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी १३० रुग्णांचे काेराेना स्क्रीनिंग करण्यात अाले. त्यापैकी १२२ जणांमध्ये काेराेनाची लक्षणे न अाढळल्याने घरी साेडण्यात अाले. ८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात अाले. ३ जणांच्या थुंकीचे नमुने घेण्यात येऊन धुळे प्रयाेगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नाशिक : जिल्ह्यात ४८ जण पॉझिटिव्ह, मालेगावात ४०

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून गुरुवारी त्यात आणखी दोनने वाढ झाली. यामध्ये नाशिकच्या सातपूर परिसरातील एका महिलेचा तर मालेगावमधील एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ४८ वर गेला असून यामध्ये एकट्या मालेगावीतल ४० रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित रुग्णांत नाशिकमधील ५, चांदवड व सिन्नरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. लासलगावजवळील पिंपळगाव नजीकचा रुग्ण पूर्ण कोरोनामुक्त झाला असून यापूर्वी मालेगावातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी नाशिकमधील ६५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

सांगली : काशीला दर्शनासाठी गेलेले ३० जण क्वॉरंटाइन

काशी विश्वेश्वरच्या दर्शनासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील तीस भाविकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.  जिल्ह्यातील खानापूर, मिरज, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांतील हे भाविक  आहेत. यात २४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे ८ जण उतरले असल्याने तेथील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी वाराणसीहून परतताना ही बस मिरजजवळील भोसे येथील तपासणी नाक्यावर अडवण्यात आली. सर्वांची तपासणी केल्यानंतर  जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली. या यात्रेकरूंना मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवण्यात आले आहे. 

सातारा : साताऱ्यात ११३ विलगीकरण कक्षात दाखल

साताऱ्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथेल दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ५, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे ७१, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे १९, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे ११, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे ६ व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे १ असे एकूण ११३ जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

नागपूर : रॅपिड अँटिबाॅडी रक्तचाचण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी डॉक्टरची न्यायालयात धाव

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात संशयित रुग्णांच्या रॅपिड अँटिबॉडी रक्तचाचण्या सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावेत, या मागणीसाठी नागपुरातील सुप्रसिद्ध छातीरोगतज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. राजेश स्वर्णकार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रॅपिड अँटिबॉडी रक्तचाचण्या सुरू करण्याची मागणी करताना इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या शिफारशीचा दाखला दिला आहे. पीसीआर चाचण्यांच्या माध्यमातून निदान केले जात असल्याने त्याला लागणारा खर्च व कालावधी खूप जास्त आहे. मात्र, रॅपिड अँटिबॉडी रक्तचाचण्यांमुळे  वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. या चाचण्या कुठल्याही पॅथॉलॉजिस्टकडे केल्या जाऊ शकतात. खासगी प्रयोगशाळांनाही या चाचण्या पार पाडणे शक्य होईल, असेही डॉ. स्वर्णकार यांना सुचवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...