आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट टीआरपी प्रकरण:रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमातून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीच्या संपादकीय विभागातील काही कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांची बदनामी करणे आणि पोलिसांविरोधात द्वेष पसरवणे आणि लोकांच्या भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष पथकाचे उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी रिपब्लिक टीव्हीच्या २२ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमाबाबत एन.एम.जोशी मार्ग ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

यात रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक, डेप्युटी न्यूज एडिटर, अँकर आणि सीनियर असोसिएट एडिटर यांच्यासह संपादकीय विभागातील तसेच न्यूजरूम इनचार्जची नावे आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत.

दरम्यान, ही कारवाई बदल्याच्या भावनेने केली असून हे धक्कादायक असल्याचे रिपब्लिक टीव्हीने म्हटले आहे. तसेच हा माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप रिपब्लिक टीव्हीने केला आहे. बनावट टीआरपीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माध्यम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून यात रिपब्लिक टीव्हीचे नाव आघाडीवर होते. शिवाय, बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोपही या वाहिनीवर केला जात होता.

वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमातून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप
तक्रारदार पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार म्हणाले, वृत्तवाहिनीतील काही कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काही रिपोर्ट प्रकाशित केले होते. यात इतर गोष्टींशिवाय मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वृत्तात परमबीर यांच्याविरोधात विद्रोह अशी हेडलाइन देण्यात आली होती. तसेच पोलिस अधिकारी पोलिस आयुक्त परमबीर यांचे आदेश मानत नसल्याचेही यात म्हटले आहे.