आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भाजपवर कडाडून टीका:गुजरातचा ‘पोपट’ जगवण्यासाठी भाजपकडून शिकस्त, पण, मोरबीच्या दुर्घटनेमुळे शिजवलेली खिचडी एका क्षणात करपली

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी-शहांचे राज्य म्हणून गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे साहजिकच साऱ्या देशाचे लक्ष आहे. गोष्टीतील राजाचा प्राण जसा पिंजऱ्यातील पोपटात अडकलेला असतो तसाच पंतप्रधान मोदींचा जीव गुजरातेत अडकला आहे. गुजरात म्हणजे मोदी-शहांचे होम पिच.. पण तेच राज्य हातातून निसटले तर दिल्लीचे सिंहासनही डळमळीत होईल. त्यामुळेच गुजरातचा ‘पोपट’ जगवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिकस्त करत आहे, असा असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे.

गुजरातच्या गदारोळात दिल्ली महापालिका निवडणुकीचा धुरळा त्यासाठीच उडविला गेला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे उद्योग, प्रकल्प, विकासाच्या योजना सारेकाही गुजरातला पळवून नेण्यामागे एकच रहस्य आहे. पोपट जगला पाहिजे. हा पोपट भाजपच्याच नजरकैदेत राहणार की गुजरातची जनता पिंजऱ्याचे दार उघडून पोपटाची सुटका करणार हे 8 डिसेंबरलाच स्पष्ट होईल, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपच्या काळजीत भर
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राबविणाऱ्या भाजपला गेल्या वेळी काँग्रेसने घाम फोडला होता, तर यंदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपच्या नाकात दम आणला आहे. केजरीवाल यांना गुजरातेत मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आधीच घाम फुटलेल्या भाजपच्या काळजीत भर पडली आहे. बहुधा त्यामुळेच केजरीवाल आणि ‘आप’च्या पायात दिल्ली महापालिका निवडणुकीचे ‘लोढणे’ टाकून त्यांची कोंडी करण्याची खेळी केली गेली आहे.

खिचडी एका क्षणात करपून गेली
गुजरात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम प्रत्यक्षात गेले दोन महिने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही आलटून पालटून दर आठवडय़ाला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातमध्ये दौरे करीत होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास प्रकल्पांची उद्घाटने, पायाभरणी वगैरे समारंभी फार्सना गुजरातमध्ये ऊत आला होता. मात्र, मोरबीच्या पूल दुर्घटनेमुळे तथाकथित गुजरात मॉडेलचा खरा चेहरा जगासमोर आला. पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे वारंवार दौरे आखून भाजपने शिजवलेली खिचडी एका क्षणात करपून गेली, अशी कडाडून टीका 'सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

विरोधकांकडे गमविण्यासारखे काही नाही
गुजरातच्या निवडणुकीला इतर कुठल्याही राज्यांपेक्षा अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे हे राज्य. शिवाय गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीकडे अगदीच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल किंवा रंगीत तालीम म्हणून पाहता येणार नाही. कारण गुजरातमध्ये एकतर विरोधकांकडे गमविण्यासारखे काही राहिलेले नाही आणि भाजपविरोधी मतांच्या फाटाफुटीमुळे कमविण्यासारखे काय उरले आहे, हाही प्रश्नच म्हणावा लागेल, असे सामनात म्हटले.

बातम्या आणखी आहेत...