आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:राज्यात डेल्टा प्लसचे 45 रुग्ण, जळगावात सर्वाधिक 13, औरंगाबाद-बीड-नंदुरबारमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४५ रुग्ण आढळल्याचा अहवाल आला आहे. राज्य एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या रविवारच्या अहवालात हे स्पष्ट झाले. डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले असून पुण्यात ३, तर औरंगाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

कोविड प्रतिबंध आणि नियमित उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेन्सिंग) नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. जिनोमिक सिक्वेन्सिंग दोन प्रकारे करण्यात येत असून त्यासाठी राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची सेंटिनल सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सेंटिनल सेंटर दर पंधरवड्याला १५ नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी संस्था विज्ञान संस्थेस पाठवते, तर जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सीएसआयआर अंतर्गत संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी संस्थेशी राज्य शासनाने करार केला असून या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येेते.

सर्वाधिक रुग्ण १९ ते ४५ वयोगटात
डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक २० रुग्ण १९ ते ४५ वयोगटात आढळले असून त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १४ रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील ६ बालके आणि ६० वर्षांवरील ५ रुग्ण आहेत.

आजाराचे स्वरूप सौम्य ते मध्यम
या अहवालातील दिलासादायक बाब म्हणजे ४५ पैकी ३४ रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून रत्नागिरीतील एका मृत्यूचा अपवाद वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरूप सौम्य ते मध्यम स्वरूपाचे आहे.

कोविशील्ड-कोव्हॅक्सिनचा मिक्स डोसकोराेना संसर्गावर ठरतो अधिक गुणकारी
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्स डोस लोकांना अधिक फायदेशीर ठरत आहे. याचा परिणाम एखाद्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसपेक्षा अधिक प्रभावी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) हा दावा केला आहे. कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करून या संस्थांनी हा निष्कर्ष काढला आहे.

या संशोधनात असे आढळून आले की, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्स डोस घेतला असेल तर प्रतिकारशक्ती अधिक वाढते. या लसींचे डोस घेतल्यानंतर दिसून येणारे काही प्रतिकूल परिणामही दोन्ही डोसमध्ये समान आढळून आले आहेत. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशात सिद्धार्थनगरमध्ये १८ लोकांनी चुकून पहिला डोस कोविशील्डचा घेतला आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा. यावर अभ्यास करण्यात आला. या १८ लोकांचा अन्य ४० लोकांत अभ्यासासाठी समावेश करण्यात आला.

विषाणूंच्या सर्वच स्वरूपांविरुद्ध अधिक प्रतिकारशक्ती
कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचा वेगवेगळ्या लसींचे डोस घेतलेल्या या १८ लोकांशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यांच्यात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती तपासण्यात आली. विशेष म्हणजेे वेगवेगळ्या लसींचे डोस घेणाऱ्यांमध्ये अल्फा, बीटा आणि डेल्टा विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती खूपच अधिक होती. या निष्कर्षांचा लसीकरण मोहिमेत आगामी काळात महत्त्वाचा परिणाम होणार आहे. यातून सार्स-सीओव्ही-२च्या विविध स्वरूपांविरुद्ध अधिक सुरक्षा मिळवण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...