आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धास्ती ओमायक्रॉनची:प्राणवायूची मागणी 60 मेट्रिक टनांवर, 700 टनांची मागणी झाल्यास टाळेबंदी, निर्बंधासाठी रुग्णसंख्येच्या निकषाची शक्यता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे राज्याचे धोरण आहे. राज्यात सध्या १ लाख १४ हजार ८४७ सक्रिय रुग्ण असून दैनंदिन ५० ते ६० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची आवश्यकता भासत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे, तर दुसरीकडे प्राणवायूची गरज कमी भासत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार लाॅकडाऊनविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना लिक्विड ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली. मात्र, मागणी व पुरवठा यात मोठी तफावत राहिल्याने झारखंड, कर्नाटकसह इतर काही राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. राज्यात दुसऱ्या लाटेदरम्यान १२५० मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होती. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील ४५० जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत पीएसए आणि एएसयू प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत २६० हून अधिक पीएसए आणि एएसयू प्लँट उभारले गेले आहेत. राज्यात सध्या २३०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे.

पहिल्या लाटेत २० लाख, तर दुसऱ्या लाटेत ४० लाख नागरिक कोरोनाने बाधित होते. तिसऱ्या लाटेत ८० लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होईल असा अंदाज आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या ६५ हजारांच्या घरात आहे. पण पुढच्या १५ दिवसांत ती वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात ६५ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील केवळ १८०० रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यांना दैनंदिन ५० ते ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ओमायक्रॉनबाधित रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासत नाही तसेच हे रुग्ण ५ ते ६ दिवसांत बरे होत आहेत. ७०० मेट्रिक टन आॅक्सिजनचे सूत्र तिसऱ्या लाटेत कालबाह्य ठरले आहे. त्यामुळे सरकार आता रुग्णसंख्येचा निकष लावून लाॅकडाऊनची चाचपणी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने २० हजार दैनंदिन रुग्णसंख्या आढळल्यास लाॅकडाऊनचा इशारा दिला आहे. रुग्णसंख्येेचे हे सूत्र इतर स्थानिक स्वराज्य संस्था लागू करतील असा संशय आहे.

सध्याची प्राणवायू स्थिती
- राज्यात १२० आॅक्सिजन रिफिलर्स असून त्यांच्याकडे ३१३८ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजन साठवणूक क्षमता आहे.
- रुग्णालयांना रिफिलर्सद्वारे मागच्या आठवड्यात २३२.७१ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजन पुरवठा करण्यात आला.
- मागच्या आठवड्यात रुग्णालयांना उत्पादकांद्वारे परस्पर ८८.०५ मेट्रिक टन लिक्विड आॅक्सिजन पुरवठा केला.
- मागच्या आठवड्यात एकूण ३२०.७६ मेट्रिक टन आॅक्सिजन पुरवठा केला.

बातम्या आणखी आहेत...