आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल:नोएडातील ट्विन टॉवर पाडले, मुंबईतील शेकडो अनधिकृत टॉवर्सचे काय?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडातील अनधिकृत टॉवर्स काल पाडले. मुंबईतील अशा शेकडो अनधिकृत टॉवर्सचे काय?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत मुंबईतील बेकायदा टॉवर्स, इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे की, नोएडातील अनधिकृत ट्वविट टॉवर्सप्रमाणेच मुंबईत शेकडो अनधिकृत टॉवर्स, हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. हे मजले अजूनही उभे आहेत. त्यामुळे त्यातील मध्यमवर्गीय सदनिकाधारक असुरक्षित, भीतीत आहेत. त्यांचे काय?

शिंदे, फडणवीसांनी प्रेरणा घ्यावी

सोमय्या म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाकडून नोएडातील ट्वविन टॉवर्स पाडण्याचे आदेश आले त्याचे स्वागत आहे. आता याच्यातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अशा हजारो सदनिकाधारकांची काळजी करावी.

मुंबई पालिकेत भ्रष्ट कारभार

सोमय्या म्हणाले, मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे गेल्या काही वर्षांत असे अनेक अनधिकृत टॉवर्स उभे राहिले आहेत. अशा शेकडो इमारती आहेत की ज्यात वरचे अनेक मजले अनधिकृत आहेत. बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक, अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून असे अनधिकृत मजले मुंबई उपनगरातील शेकडो इमारतीमध्ये बांधले व त्यातील सदनिका मध्यमवर्गीय परिवारांना विकले. अशा शेकडो इमारती आहेत ज्यात है सदनिकाधारक राहण्यास गेले आहेत. पण, अजूनपर्यंत त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (OC), वापर परवाना मिळालेला नाही.

विशेष ऑडिट करावे

मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या अनधिकृत टॉवर्स, अनधिकृत मजले व इमारतींना अजून भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाले नाही किंवा पार्ट ओसी देण्यात आले आहेत, त्यांचे विशेष ऑडिट करावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या म्हणाले, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या सदनिकाधारकांनी चौकशी केल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, या अनधिकृत मजल्यांचा FSI, TDR बिल्डर्सनी घेतलेला नाही किंवा विकत घेतलेला नाही. म्हणून त्यांना वापर परवाना देण्यात येऊ शकत नाही. याकडे लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...