आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी बोलताना सुहास कांदे यांनी थेट, "तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले" असे विधान केले. कांदेंचे या विधानाने ते सध्या चर्चेत आले आहे.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात महाविकास महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांचा वाद सुरू आहे. त्यावेळी हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यात ठाकरेंनी हस्तक्षेप करून तो वाद काही अंशी मिटवला होता. मात्र, आज विधीमंडळाच्या सभागृहात पुन्हा हा वाद उफाळून आला. सभागृहात आज महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी कांदे आक्रमक झाले, त्यांच्या प्रश्नांची उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मात्र, तरीही त्यांचा राग काही कमी झाला नव्हता, त्यानंतर त्यांनी तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले, असे विधान केले आहे.
तुमच्याकडे बघून बंडखोरी
महाराष्ट्र सदन प्रकरणात मविआने छगन भुजबळ यांना क्लिन चीट देण्यात आली असून, आज पुन्हा कांदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर समाधान न झाल्याने ‘अहो फडणवीस साहेब, असं काय करताय..? तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय...’, असे आमदार कांदे म्हणाले.
सदनात 1860 कोटींचा घोटाळा
यावेळी सुहास कांदे यांनी सुरवातीलाच 2015 च्या सुमारास झालेल्या महाराष्ट्र सदन घोटाळयाचा लेखाजोखा मांडला. अंजली दमानिया आणि किरीट सोमय्या यांनी अंधेरी आरटीओ आणि महाराष्ट्र सदन संदर्भात तक्रार दाखल केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यावर प्रश्न उपस्थित करताना कांदे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस तुम्ही जे उत्तर दिले आहे, त्यावर मी समाधानी नाही. 1860 कोटी रुपयांचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे. तत्कालीन मंत्र्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2021 ला पुन्हा जीआर काढण्यात आला होता. 21 मार्च 2022 रोजी उच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असे पत्रही काढण्यात आले होते. मग नंतर असे काय प्रेम उफाळून आले की या घोटाळ्यात सरकार अपिलात गेले नाही.
भ्रष्टाचार करून ओपीनियन
पुढे कांदे म्हणाले की, "या प्रकरणात सातभाई नामक न्यायाधीशांची बदली करण्यात आली. ज्याअर्थी त्या निकालामुळे न्यायाधीशांची बदली झाली त्या अर्थी तो निकाल संदिग्ध आहे. यासाठी तुम्हाला पुन्हा ओपीनियन मागवायची गरज नाही. म्हणजेच तुम्ही भ्रष्टाचार करुन ओपीनियन मागवले. तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल तर केलेच. जर दोन जीआर निघाले, पण पुन्हा अपिलात जाऊन ओपीनियन मागवायची गरजच नाहीये. जर आपण पुर्वीच्या सरकारचे निर्णय बदलले तर हा निर्णय बदलायला काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.