आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असे बोलू नका. बैल शेतकऱ्यांचा राजा आहे. कालच नागपंचमी झाली. असे म्हणतात की नागाला कितीही दूध पाजले तरी तो चावतोच. या सर्वांनाही निष्ठेचे दूध पाजले. पण ही औलाद गद्दार निघाली,’ अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचे नाव न घेता केली. जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता त्यांना शिवसैनिकांचे काटे बघायचे आहेत, असेही ते म्हणाले.
बुधवारी जळगाव आणि वाशिममधून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी “मातोश्री’वर दाखल झाले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, आता मी राज्यभर फिरणार आहे. सदस्य नोंदणीवर भर द्या. सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या विधानसभेच्या निवडणुका. मग दाखवून देऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
यांच्या गोवऱ्या रचल्या जातील : भाजपच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपवण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील, अशी टीका “सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
भाषेची सभ्यता जपण्याचा उद्धव ठाकरे यांचा सल्ला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावून पक्षातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा केली. या वेळी उद्धव यांनी प्रवक्त्यांना भाषेची सभ्यता जपा, असा सल्ला दिला. या बैठकीनंतर शिवसेना प्रवक्ते अरविंद सावंत यांनी माध्यमांना सांगितले की, पक्षावर झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार करा. पण त्याच वेळी भाषेची सभ्यता जोपासण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते सचिन अहिर म्हणाले की, आपली भूमिका प्रभावीपणे कशी पार पाडावी यावर ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अन्य एका प्रवक्त्याने शिवसेना संघटनेत अनेक मोठे बदल होणार असून यात शिवसेनेच्या प्रवक्त्यांत नव्याने भर पडेल, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.