आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना आला वेग...:राहुल नार्वेकरांच्या भेटीला कायदामंत्री; शिंदे राज्यपालांकडे!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार यांची राजकीय निवृत्ती, सत्तासंघर्षाबाबत जवळ आलेला निकाल या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला होता. मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अनपेक्षित भेट घेतली, तर कर्नाटकात जाण्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाच्या निमित्ताने सायंकाळी राज्यपाल रमेश बैस यांच्याशी राजभवनावर गुफ्तगू केली. शिंदे गट अपात्र ठरल्यास किंवा राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत आल्यास बैस व नार्वेकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही भेटींना महत्त्व आले आहे.

कोर्टही अपात्र ठरवू शकते
आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण कोर्ट विधानसभा अध्यक्षाकडे पाठवेलच असे नाही. अनेक प्रकरणांत कोर्टाने थेट निर्णय दिलेला आहे. आमदार ६ वर्षे अपात्र ठरले तरी तो कालावधी विद्यमान विधानसभापुरताच (२०१९ ते २०१४) असतो. हे आमदार पुढच्या ६ वर्षांसाठी अपात्र असतील असे नाही, असा दावा विधानसभेचे प्रधान सचिव (निवृत्त) अनंत कळसे यांनी केला.

पर्याय 1 : शिंदे गटाच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिला तरी अध्यक्ष देतील अभय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व १६ आमदारांना न्यायालयाने दोषी ठरवले तरी अपात्रतेच्या निर्णयासाठी कोर्ट हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सोपवू शकते. कारण अपात्रता ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा नसून विधानसभेचा आहे. भाजप नेते राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. कोर्टाने निर्णय दिला तरी नार्वेकर आमदारांना अभय देऊ शकतील किंवा निर्णय अनिश्चित काळासाठी लांबवू शकतात. कायदामंत्री रिजिजू यांनी अनेकदा न्यायसंस्थेशी प्रतिकूल मत व्यक्त केले आहेत. त्यामुळे कोर्टाचा निकाल आल्यावर नेमके काय करायचे, याबाबत त्यांनी नार्वेकरांना ‘मार्गदर्शन’ केले असण्याची शक्यता आहे.

पर्याय 2 : शिंदे पायउतार झालेच तर राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये येईल
सर्वोच्च न्यायालयाने शिंदंेसह १६ आमदारांना अपात्र ठरवले आणि नैतिकता पाळण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनीही तसाच निर्णय दिला तर एकनाथ शिंदे पायउतार होतील. परिणामी काठावर बहुमत असलेले युतीचे सरकार अस्थिर होईल. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराज अजितदादांसह ४० आमदारांचा गट तातडीने सरकारमध्ये समाविष्ट करून घेत सरकार बळकट करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे एकूण ५४ आमदार आहेत. त्यापैकी ४० आमदार दादांसोबत आहेत. म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा डाव खेळला जाऊ शकतो.

अंतिम निर्णय माझाच : राहुल नार्वेकर
कोर्टाने शिंदे गटाला अपात्र मानले तरी ते ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल. त्यामुळे अंतिम निर्णय माझा राहील. त्यावर ज्यांना आक्षेप असेल ते कोर्टात जाऊ शकतील, असे नार्वेकर म्हणाले.