आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेन भारती यांनी स्वीकारला पदभार:मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळणार; फडणवीस यांच्या मर्जीमुळे चर्चेत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदाचा पदभार आज आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी स्वीकारला. विशेष म्हणजे या पदाची खास भारती यांच्यासाठीच निर्मिती केल्याची चर्चा रंगली आहे.

देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची कालच या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत भारती?

देवेन भारती हे भारतीय पोलिस सेवेतील 1994 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.त्यांनी यापूर्वी दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 या कालावधीत भारती हे मुंबई पोलिस दलातील सर्वात प्रभावी अधिकारी होते. फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून भारती ओळखले जातात.

आघाडीच्या काळात बदली

राज्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. जून महिन्यात राज्यात सत्तांतर होऊन गृह खात्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर देवेन भारती पुन्हा चर्चेत आले होते.

फडणवीस यांचे विश्वासू

फोन टॅपिंग प्रकरणात काही दिवसांपूर्वी आयपीएस रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली. ही चर्चा थंड बस्त्यात जाते न जाते तोच देवेन भारती यांच्या नियुक्तीची बातमी आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारती यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार येताच त्यांची वाहतूक विभागात सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली. आता पुन्हा फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांच्यासाठी खास पद निर्मिती करण्यात आली आहे. यावरून ते फडणवीस यांच्या मर्जीतले असल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर...

शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर खास मुंबईसाठी पोलिस विशेष आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर या पदावर भारती यांची वर्णी लागली आहे. आगामी काळात मुंबईतला कायदा-सुव्यवस्थेचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक येणाऱ्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

संबंधित वृत्तः

फडणवीसांच्या मर्जीने भारती विशेष पोलिस आयुक्तपदी:गृहमंत्र्यांवर समांतर प्रशासनाचा काँग्रेसचा आरोप

बातम्या आणखी आहेत...