आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टची केवळ देवेन भारती यांच्यासाठीच निर्मिती केल्याची चर्चा आहे.
देवेन भारती हे यापूर्वी मुंबई शहराचे सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांची मोक्याची जागी वर्णी लागेल, अशी चर्चा होती. ती आता खरी ठरताना दिसते आहे.
कोण आहेत भारती?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले अधिकारी म्हणून देवेन भारती यांना ओळखले जाते. ते 1994 सालचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी यापूर्वी दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. मुंबई हल्ल्यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास त्यांनी केला आहे.
अखेर मोक्याच्या जागी
पोलिसांच्या बदल्या या नेहमीच चर्चेचा विषय असतात. काहीच दिवसांपूर्वी फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली. ही चर्चा थंड बस्त्यात जाते न जाते तोच देवेन भारती यांच्या नियुक्तीची बातमी आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारती यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार येताच त्यांची वाहतूक विभागात सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती.
नियुक्ती महत्त्वाची का?
शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर खास मुंबईसाठी पोलिस विशेष आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर या पदावर भारती यांची वर्णी लागली आहे. आगामी काळात मुंबईतला कायदा-सुव्यवस्थेचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक येणाऱ्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.