आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रत्युत्तर:रिक्षाचं स्टिअरिंग उद्धवजींच्या हातात, पण कुठे न्यायचा हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते : देवेंद्र फडणवीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने पैसा दिला, पण राज्य सरकारने पुढाकारच घेतला नाही, फडणवीसांचा आरोप

तीन चाकी ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. ऑटोरिक्षा कुठे न्यायचा, हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते. सवारी विरोधात रिक्षा चालवली तर चालकाच्या रोजगारावर गदा येते, असा टोला फडणवीस यांनी लगावला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. ''उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो'' अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बोलताना आघाडी सरकारवर निशाणा साधला.

किमान सरकार चालवून तर दाखवा

फडणवीस म्हणाले की, सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, हे धोक्याने आलेले सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचे काम आहे” असे फडणवीस म्हणाले.

...तर मुंबईत परिवर्तन झालेले दिसेल

कोरोनाच्या चाचणीत महाराष्ट्र देशात 19 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत तर चाचण्या फारच कमी केल्या जातात. त्यामुळे मृत्युदर वाढतो आहे. एक महिना मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या, तर मुंबईत परिवर्तन झालेले दिसेल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत

कोरोनाचे संकट ओळखून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठे काम केले. मुंबईत मोठ्या संसर्गामुळे काम करणे अतिशय कठीण होते. तरी सुद्धा अतिशय चांगले काम पक्षाने केले. 30 कार्यकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे फडणवीस म्हणाले. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक पालिका-महापालिकांना आर्थिक मदत नाही. राज्य सरकारने योग्य पाऊले टाकली तर महाराष्ट्र लवकर या समस्येतून बाहेर पडेल, असेही फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारने पैसा दिला. पण राज्य सरकारने पुढाकारच घेतला नाही

राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. शेतमालाची खरेदी होत नाही. केंद्र सरकारने पैसा दिला. पण राज्य सरकारने पुढाकारच घेतला नाही. आज दूध उत्पादक संकटात आहे. आमच्या सरकारच्या काळात किमान 1000 कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले. राज्य सरकारने ज्यांची दूध खरेदी केली, त्यांची नावं एकदा जाहीर करा. युरियाचा आज सर्रास काळाबाजार होतो आहे. सरकारी बियाणंच नकली निघणार असेल, तर शेतकऱ्यांनी बघावं तरी कुणाकडे, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला, त्याचे अध्यक्ष अमित शाहजी हे आहेत. शरद पवार यांनी सुद्धा त्यांनाच पत्र लिहिले. आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल, तर शेतकऱ्यांचे काय होणार, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

भाजप 1 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसाठी करणार आंदोलन

वंचितांसाठी एल्गार करण्याऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती 1 ऑगस्ट रोजी आहे. तसेच स्वातंत्र्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य टिळक यांची 100 वी पुण्यतिथी सुद्धा त्याचदिवशी आहे, त्यामुळेच यादिवशी आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.