आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर:कांजूर मेट्रो कारशेडचा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती : देवेंद्र फडणवीस

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी कांजूरमार्ग कारशेडच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीका केली. हवं तर कांजूर कारशेडचे श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले होते. यावर फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले फडणवीस?

''30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा लागेल. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवालही फडणवीसांनी विचारला.

फडणवीस म्हणाले की, ''बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!''

काय म्हटले होते मुख्यमंत्री?

कांजूर मार्गा येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडचा वाद हा जनतेच्या हिताचा नाही. त्याला आपल्या प्रतिष्ठेचा विषय करू नका. तुमची जागा आणि माझी जागा असं म्हणून खेचाखेची करू नका. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगणार? आडवाआडवी केली? खेचाखेची केली? हा कद्रूपणा आहे. तो सोडवायला हवा, असे सांगतानाच माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे, या बसून चर्चा करून प्रश्न सोडवू. तुम्ही हा प्रश्न सोडवा. तुम्हाला श्रेय देतो. इथे माझ्या इगोचा प्रश्न नाही. तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...