आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Devendra Fadanvis MahaIT Sacam | Sanjay Raut Press Conference Mumbai | Fadnavis' MahaIT Scam Worth Rs 25,000 Crore, While Somaiya Looted Land Worth Rs 400 Crore To Rs 4.5 Crore: Raut

शिवसेना भवनाबाहेर शक्तिप्रदर्शन:फडणवीसांचा महाआयटी घोटाळा 25 हजार कोटींचा, तर सोमय्यांनी चारशे कोटींची जमीन 4.5 कोटीत लाटली : राऊत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी दादरमध्ये जमले हजारो शिवसैनिक
  • मलिकांसारखेच राऊतही तोंडावर पडतील- भाजप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वत:वरील आणि शिवसेनेवरील आराेपांचा प्रतिवाद करतानाच किरीट साेमय्या यांच्यासह तत्कालीन फडणवीस सरकारमधील भाजप मंत्री आणि नेत्यांवर टीकेची झाेड उठवली. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाआयटीच्या माध्यमातून २५ हजार काेटींचा घाेटाळा झाला. भाजपा नेते किरीट सोमय्या इतरांवर पीएमसी बँक घोटाळ्याचा आरोप करतात पण त्यांचाही त्यात सहभाग आहे. राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून त्यांनी त्याच्याकडून ८० ते १०० कोटींची राेकड घेतली’, असे आराेप त्यांनी केलेे.

‘निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत राकेश वाधवान आणि किरीट साेमय्या यांचा मुलगा नील साेमय्या हे दोघे भागीदार आहेत. किरीट साेमय्या यांनी देवेंद्र लधवानी नामक व्यक्तीला पुढे करून वसईतील मौजे गोखीवरे येथील ४०० कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीत विकत घेतली’. हा पीएमसी बँक घोटाळ्यातलाच पैसा आहे, असे सांगत राऊत यांनी आराेपांची माळच लावली.

‘संबंधित सर्व कागदपत्रे मी ईडीला तीन वेळा पाठविली आहेत, पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. म्हणून आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसेच वसईतील या प्रोजेक्टला हरित लवादाचीही परवानगी नसल्याने त्यावर कारवाईचीही माझी मागणी आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपशी संबंधितांनी माेठे गैरव्यवहार केल्याची टीकाही राऊत यांनी केली.

राज्य सरकारने कारवाई करावी
भाजप नेत्यांवर पुराव्यानिशी केलेले हे आरोप गंभीर आहेत. विरोधी पक्षांना नाहक बदनाम करण्याऱ्या भाजपचे पितळ राऊत यांनी उघडे पाडले. महाविकास आघाडी सरकारने या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी. मुंबईतील बिल्डरांकडून ईडीने गोळा केलेले पैसे मोदी, शहांना दिले का? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मान्यवर नेत्यांची उपस्थिती

पत्रकार परिषदेतला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते सचिन अहिर, खासदार अनिल देसाई, आमदार मनीषा कायंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार सदा सरवणकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

.. तर राजकारण सोडेन
अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबीयांचे १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यांना आव्हान आहे की हे १९ बंगले दाखवावेत. ते जर त्यांनी दाखविले तर मी राजकारण सोडेन. त्यांनी नाही दाखविले तर अख्खी शिवसेना सोमय्यांना जोड्याने मारेल, असेही राऊत म्हणाले.

शहांना फोन केला
राज्यातील सरकार पाडायला मी नकार दिल्यानंतर माझ्या निकटवर्तीयांच्या घरात ईडीच्या धाडी सुरू झाल्या. त्या रात्री मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना फोन केला, पण काही उपयोग झाला नाही. इतरही काही लोकांशी मी त्यावेळी बोललो असेही राऊत म्हणाले.

ही कसली संस्कृती?
ही पत्रकार परिषद नसून फुसका बार होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरे राऊतांनी काढली. एवढी घसरलेली भाषा वापरून राज्यातील महिलांचा अपमानच केला. ज्या अविर्भावात आरोप केले, पुरावे होते मग कारवाई का केली नाही? राज्यात सरकार तर यांचेच आहे ना. -चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

माझ्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला याची माहिती काढण्यासाठी ईडीचे अधिकारी पताकावाले, फुलवाले इतकेच नाही तर मेहंदीवाल्यांच्या घरीही पोहाेचले. पण, काही वर्षांपूर्वी भाजपच्या माजी वनमंत्र्यांच्या मुलीचे लग्न मुंबईत झाले. त्यावेळी तर जंगलाचा फिल यावा म्हणून एक कार्पेट टाकण्यात आले होते. त्याची किंमत ९ कोटी रुपये होती, असा आरोप राऊत यानी केला.

खोदा पहाड, निकला चूहा
पीएनबी बँकेची चौकशी झाली आहे. त्यात काही तथ्य आढळले नाही. महाराष्ट्र महापरिषद म्हणजे ड्रामा ठरला आहे. त्यांची मानसिकता ठीक नाही. त्यांनी मानसोपचार केंद्रात जाऊन इलाज करून घ्यावा. त्यांनी केलेले आरोप गुन्हा दाखल करण्याजोगे असंसदीय आहेत. गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आम्ही केली आहे. - प्रसाद लाड, भाजप आमदार

चाैकशीला काेणी अडवलंय?
गंभीरतेने घेणे गरजेचे नाही. तुमच्या हाती सत्ता आहे. तुम्हाला चौकशीसाठी कोणी अडवलंय? कोणी थांबवलंय? अहवाल आणा. त्यांच्या खर्चावर बोट ठेवले गेले त्यामुळे माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च काढला. त्यात कोणताही गैरव्यवहार सिद्ध झाला नाही. केंद्रीय तपास यंत्रणांना हे का घाबरत आहेत? -सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री

गर्जेल तो पडेल काय?

मोठे प्रकरण बाहेर काढण्याचे वातावरण निर्माण केले फक्त. आरोप केल्याने काही होत नाही. पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही. गर्जेल तो पडेल काय असे हे झाले. अडचणीत आलेला थयथयाट करतो तसा हा प्रकार होता. -चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

माझी जरूर चौकशी करा
ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध १० गुन्हे दाखल केले आहेत. आणखी ३ दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व चौकशीसाठी मी तयार आहे. मी व माझ्या कुटुंबाचा कोणत्याही भ्रष्ट व्यवहारात सहभाग नाही. कोविड केंद्र गैरव्यवहार, प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यावर राऊत एक शब्दही का बोलले नाहीत? -किरीट साेमय्या, भाजप नेते

बातम्या आणखी आहेत...