आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारवर टीका:'आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करा', कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीसांचा टोला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाही तर मुख्यमंत्री आहेत

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले असून ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश न्यायालयाने आज (बुधवार) एमएमआरडीएला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाच्या दणक्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मुंबई हायकोर्टाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच या आरेतील जागेला मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनातदेखील मी हीच भूमिका मांडली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी मिठाचा खडा का टाकता असे बोलले होते, पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, असा टोला फडणवीसांनी लगावला.

त्याच जागेसाठी अट्टाहास का?
'विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करायला नको. मुंबईच्या विकासासाठी काम ही कामे करायला हवीत. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित सुरू केले नाही तर प्रकल्प 2024 पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाही तर मुख्यमंत्री आहेत
'कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी जेवढा उशीर करण्यात येईल, तितका खर्च वाढणार आहे. याच कारणामुळे मुंबईकरांवरच त्याचा आर्थिक भार येणार आहे. राज्य सरकारने आपला ईगो सोडून द्यावा आणि जनतेचे नुकसान करू नये, असेही फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हे एखाद्या पक्षाचे प्रमुख नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत. एका संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी कायदेशीरबाबी समजून घेतली पाहिजे आणि पुढे जावे असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...