आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6.3 जीबी डेटा:पाेलिस दलात ‘बदली’ रॅकेट; आता फडणवीसांचा ‘डेटा बाॅम्ब’; पत्रव्यवहाराचा लखोटा केंद्रीय गृहसचिवांकडे सुपूर्द

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत दाखवलेला पेनड्राइव्ह फडणवीसांनी केंद्रीय गृहसचिवांना दिला. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत दाखवलेला पेनड्राइव्ह फडणवीसांनी केंद्रीय गृहसचिवांना दिला.

राज्य पोलिस दलात बदल्यांचे रॅकेट असून याप्रकरणी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बाजूला करण्यात आले, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंबंधी तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच फडणवीस यांनी उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर फडणवीस यांनी पोलिस बदल्यांसाठी झालेल्या फोन टॅपिंगचा डेटा दिल्याने या डेटा बॉम्बचे हादरे महाविकास आघाडी सरकारला बसले आहेत. मंगळवारी सकाळी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषद आटोपताच फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांमधील पत्रव्यवहार असलेला एक बंद लखोटा आणि ६.३ जीबीचा पेनड्राइव्ह त्यांना सूपर्द केला. या बदलीच्या रॅकेटच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुंबईतील हाेम क्वाॅरंटाइनसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेले विविध दावेही फडणवीस यांनी पुराव्यानिशी खोडून काढले.

फोन टॅपिंगची शिक्षा म्हणूनच रश्मी शुक्लांची बदली : राष्ट्रवादी
आघाडी सरकार बनत असताना गुप्तवार्ता प्रमुख रश्मी शुक्ला भाजपसाठी फोन टॅप करीत होत्या असा गंभीर आरोप करून या अनधिकृत फोन टॅपिंगमुळेच शिक्षा म्हणून त्यांची बदली करण्यात आली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच पक्ष प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांचे आरोप खोडले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्यांना पोलिस बदली नियमावली माहिती असतानादेखील त्यांनी खोटा अहवाल सादर केला,असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण
पोलिस दलातील बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी राज्य गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोनवरील संभाषणाच्या आधारे एक गोपनीय अहवाल तयार केला होता. अहवाल तयार करण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसार अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांची रीतसर परवानगीही घेतली होती. हा अहवाल तत्कालीन पोलिस महासंचालकांनी गृह विभागाकडे सादर केला. या अहवालात सीआयडी चौकशीची शिफारस करण्यात आली होती.

1. गृहमंत्री देशमुख १५ तारखेला मुंबईत
शरद पवार यांनी १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरमध्ये होम क्वाॅरंटाइन होते असा दावा केला आहे. पण, देशमुख हे १५ तारखेलाच विमानाने मुंबईला गेले होते. १७ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख हे सह्याद्री अतिथी गृहावर आले होते. २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा अनिल देशमुख यांनी कारने प्रवास केला होता.

2. क्वॉरंटाइन काळात गृहमंत्र्यांच्या भेटीगाठी
२. पोलिसांकडे मंत्र्यांच्या हालचालीची नोंद असते. पण गृहमंत्री यांनी प्रवास केला की, नाही यावर मी बोलणार नाही. शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडातून खोटी माहिती देण्यात आली आहे. क्वाॅरंटाइनच्या काळात अनिल देशमुख हे अनेक लोकांना भेटले होते, असा दावाही फडणवीसांनी केला.

७ महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे : २५ ऑगस्ट २०२० पासून आजपर्यंत सुमारे ७ महिने या संवेदनशील अहवालावर काेणतीही कारवाई मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. हा प्रकार अतिशय गंभीर असून, राज्य सरकार कुठलीच दखल घेत नसल्याने आणि मुख्यमंत्री यावर काहीही बोलण्यास तयार नसल्याने गृह खात्याचे पालक म्हणून हा अहवाल आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत, असेही ते म्हणाले.

रॅकेट उघड करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याचीच उचलबांगडी
अहवालावर कारवाई करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यासाठी अस्तित्वात नसलेले सिव्हिल डिफेन्स महासंचालक असे खाते मंत्रिमंडळाची मान्यता न घेता तयार करण्यात आले. तेथे शुक्ला यांना नियुक्ती देण्यात आली. सर्वात गंभीर बाब म्हणजे या अहवालात ज्या नियुक्त्या, पदोन्नतींसाठी देवाणघेवाणीचा उल्लेख आहे, तीच बदलीची यादी प्रत्यक्षात निघाली. असे करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यावरसुद्धा दबाव होता. पण, त्यांनी तो झुगारला आणि ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले, असा दावाही फडणवीस यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...