आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या भारतातील सेलिब्रिटीच्या ट्वीटची चौकशी आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. 'भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत', अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.
सेलिब्रिटींनी इंटरनॅशनल गायिका रिहानाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर केलेल्या ट्विटरवरील पोस्ट्सच्या चौकशीची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी त्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले. या सर्वांनी केलेल्या पोस्ट बहुतांशी एकसारख्याच जणू कॉपी पेस्टच होत्या. या पोस्ट त्यांनी कुणाच्या दबावाखाली येऊन केल्या त्याचा तपास केला जाणार आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 'संतापजनक ! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा ! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,' अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.