आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल निषेध व्यक्त केला. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन बोम्मई यांनी दिले.
कर्नाटक - महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यात आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलेय.
नेमके प्रकरण काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने उठलेली आरोप - प्रत्यारोपाची राळ शमत नाही तोच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोके वर काढलेय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या गावांनी पाणीप्रश्नी आक्रमक होत कर्नाटकात जायचा इशारा दिला. त्यानंतर अक्कलकोट, पंढरपूरमध्येही अशीच मागणी झाली. पुढे नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या नागरिकांनी गुजरातमध्ये तर नांदेड जिल्ह्यातल्या गावांनी तेलंगणामध्ये जायची मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाच्या ठिणग्या पेटल्यात. त्यात आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय.
तोडफोडीनंतर झाली चर्चा
खरे तर आज मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटक दौऱ्यावर होते. मात्र, महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये, असे म्हणत या मंत्र्यांनी आजचा दौरा रद्द केल्याचे सांगितले. तर दुसरीकडे आज कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तीव्र शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंकडे निषेध व्यक्त केला.
वाहनांना संरक्षण देणार
फडणवीस आणि बोम्मई यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल फडणवीसांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांना संरक्षण देऊ, असे आश्वासन बोम्मईंनी फडणवीसांना दिल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.