आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदुत्वानंतर आता बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. बाबरीचा ढाचा कुणी पाडला यावरून दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो, एकही शिवसैनिक नेता तिथे हजर नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर 1857 च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल असे म्हणत मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरेच्या टोमण्याला खोचक उत्तर दिले आहे.
'सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत... त्यांना न संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी तो पाहिला आहे.''त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारखे हजारो नाही लाखो कारसेवक बाबरी ढाचा पाडला तेव्हा तिथे होते. आम्हाला त्याचा अभिमान आहे, असे म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
मी झाशीच्या राणीसोबत लढत असेन -
बाबरी ढाचा पाडला तेव्हा मी स्वतः तिथे होतो. त्यावेळी मी नगरसेवक होतो. मला असे वाटते की ते 1857 चे जे ते म्हणाले त्याबद्दल सांगेन. मी हिंदू आहे त्यामुळे माझा मागचा जन्मावरही विश्वास आहे आणि पुनर्जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे मागच्या जन्मात मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन, आणि तुम्ही असाल तर तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल. कारण आता तुम्ही युती अशा लोकांशी केली आहे जे 1857 ला स्वातंत्र्ययुद्ध मानत नाहीत. ते या उठावाला शिपायचं बंड म्हणतात. त्यामुळे ठीक आहे जे बोलायचे ते बोलू द्या, असे म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला उत्तर दिले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
देवेंद्र फडणवीसांनी आपण बाबरी पाडली तेव्हा अयोध्येमध्ये होतो, असा दावा केल्यासंदर्भात विचारण्यात आले असताना आदित्य ठाकरेंनी, 1857च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल, अशी मोजक्या शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया नोंदवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.